मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पुरंदर विमानतळासंदर्भात महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पुरंदर विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या ७ गावांतील ग्रामस्थांशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुणे हे औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होणारे शहर असून अनेक उद्योग येथे येण्यास इच्छुक आहेत. त्या दृष्टीने पुरंदर विमानतळ हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. हा केवळ प्रवासी विमानतळ नसून कार्गो विमानतळही असल्यामुळे नाशवंत मालाच्या व्यापाराला चालना मिळेल. या प्रकल्पामुळे पुणे व परिसराच्या औद्योगिक विकासाला मोठा वेग मिळून पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) किमान २ टक्क्यांची वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भूसंपादनासाठी जास्तीत जास्त मोबदला
पुरंदर विमानतळ प्रकल्प व्यवहार्य होण्यासाठी सर्व बाबींचा सखोल विचार करून भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. रेडी रेकनरनुसार भूसंपादन न करता वाटाघाटीद्वारे दर निश्चित करण्यात येणार असून, शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य
प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांच्या योग्य पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. कुटुंबाची रचना लक्षात घेऊन पुनर्वसन करण्यात येणार असून सज्ञान मुलांसाठी अतिरिक्त जागा देण्यात येईल. अल्पभूधारक व भूमिहीन शेतकऱ्यांसाठी विशेष उपाययोजना करण्याबाबतही शासन विचार करीत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
नोकरी, प्रशिक्षण व अन्य लाभ
पुरंदर येथील एरोसिटी प्रकल्पात टीडीआरसह सर्व लाभ देण्यात येतील. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीत १०० टक्के प्राधान्य देण्यात येणार आहे. भूसंपादनाचा दर अंतिम झाल्यानंतर युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करून उद्योगांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल. तसेच पूर्वी झालेल्या आंदोलनांतील गुन्हे मागे घेण्याचा निर्णयही घेण्यात येईल.
संस्कृती व वारशाला सन्मान
पुरंदर विमानतळ परिसरात स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. यासोबतच प्रकल्पात शेतकऱ्यांना भागधारक करण्याचा विचार असून गावठाण पुनर्बांधणीबाबतही योग्य निर्णय घेतला जाईल.
राज्यात २०१४ नंतर राबवलेल्या प्रकल्पांमधून विकास आणि नागरिकांचे हित साधले गेले असून नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातून हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुरंदर विमानतळामुळेही या भागातील शेतकरी, नागरिक आणि उद्योग क्षेत्राला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
या बैठकीस आमदार विजय शिवतारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते




