
मुंबई(भीमराव धुळप) : SRA कार्यालयात आज मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत धारावीतील विविध तातडीच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला धारावी आमदार डॉ. ज्योतीताई गायकवाड, धारावी कोळीवाड्याचे प्रतिनिधी जोसेफ कोळी, दिंगबर कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
शताब्दी नगरातील नव्याने वाटप झालेल्या घरांमधील त्रुटींवर विशेष चर्चा करण्यात आली. काही घरांमध्ये बेडरूमचे दरवाजे बसवले नसणे, तर काही ठिकाणी खिडक्यांवर ग्रिल न बसवणे अशा गंभीर उणिवांकडे लक्ष वेधण्यात आले. या सर्व कामांची तातडीने पूर्तता करण्याचे निर्देश SRA अधिकाऱ्यांना देण्यात आले.
संग्राम नगर परिसरात सुरू असलेल्या वॉटर-वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटीच्या कामामुळे आसपासच्या घरांना पडलेल्या भेगा आणि वाढलेल्या धोक्याचाही विषय बैठकीत मांडण्यात आला. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित कुटुंबांना त्वरित सुरक्षित स्थळी हलविण्याची मागणी करण्यात आली.
धारावी कोळीवाडा येथील भूमिपुत्रांच्या जमिनीचे प्रश्नही यावेळी समोर मांडण्यात आले. कोळीवाड्याची जमीन झोपडपट्टी म्हणून दाखवून ती हस्तगत करण्याचा अदानी सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप बैठकीत व्यक्त करण्यात आला. या जमिनीचे डिमार्केशन तातडीने करून कोळी समाजाच्या घरांचे संरक्षण करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.
बैठकीनंतर बोलताना आमदार डॉ. ज्योती गायकवाड म्हणाल्या, “धारावीतील सर्वांचे प्रश्न गांभीर्याने घेतले जातील. आम्हाला अपेक्षा आहे की SRA हे सर्व कामकाज निष्पक्षपणे आणि वेगाने पूर्ण करेल.”
धारावीच्या पुनर्विकास संदर्भातील तातडीचे प्रश्न आता या बैठकीनंतर अधिकाऱ्यांकडे स्पष्टपणे पोहोचले असून, रहिवाशांना यापुढे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.




