लोणावळा :



कार्ला येथील एकविरा देवीचे नांव घेतले की शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुढे येते. एकविरा देवी कोळी, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) समाजाची असली तरीही ठाकरे घराणे व अनंत तरे यांचा एकविरा देवस्थानशी थेट संबंध आला तो योगायोगाने धर्मवीर आनंद दिघे यांच्यामुळेच.
त्याचं असं झालं, सुमारे ८०च्या दशकात (बहुधा १९७६-७७ साली) कार्ला वेहरगाव एकविरा परिसरातील परिस्थिती बिघडली होती. तेथील काही मंडळी थेट आनंद दिघे यांना भेटण्यासाठी ठाण्यात आली होती. ती मंडळी येणार आहे याची पूर्वकल्पना मला असल्याने मीसुध्दा तेथे उपस्थित होतो. खुप काही अपेक्षा घेऊन आलेल्या त्या मंडळींनी गडावरील एकूण स्थिती आनंद दिघे यांच्या कानावर घातली. ‘तुम्ही एकविरा मंदिराचा कारभार हातात घ्या’ असा त्यांचा आग्रह होता.
“एकविरा देवी सीकेपी समाजाचीसुध्दा आहे, तुमच्या समाजाचा फार पूर्वीपासून गडावर राबता आहे. त्यामुळे गडावर आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती तुम्हीच सांभाळू शकता”. त्यांचे सर्व ऐकून घेतल्यानंतर आनंद दिघे यांनी शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. आणि तासाभरामध्ये आम्ही सर्व मातोश्रीकडे रवाना झालो.
कार्ला वेहरगाव येथून आलेल्या मंडळींना शिवसेनाप्रमुखांसमोर उभे करुन त्यांची कैफियत ऐकविली. त्यांनीही एकविरा मंदिर परिसरात असलेला सावळा गोंधळ शिवसेनाप्रमुखांना सविस्तर ऐकविला. आनंद दिघे यांनी एकविरा मंदिर संस्थानचे नेतृत्व करावे, अशी त्यांची आग्रही मागणी होती. शिवसेनाप्रमुखांनीही आनंद दिघे यांना लक्ष घालण्यास सांगितले. तथापि आनंद दिघे यांनी माझ्याऐवजी अनंत तरे यांच्याकडे जबाबदारी सोपवू या अशी विनंती केली. मी जर त्यात अडकलो तर जिल्ह्याकडे दुर्लक्ष होईल असे त्यांचे म्हणणे होते. अखेरीस त्यांना आठवडाभराने येण्यासाठी सांगून रवाना केले.
मातोश्रीवरुन आम्ही निघालो, येतांना मुलुंड येथे थांबलो. अनंत तरे बँक ऑफ इंडियाच्या मुलुंड शाखेत सेवेत होते. तेथे त्यांच्या कानावर सर्व घटना घालून शिवसेनाप्रमुखांनी एकविरा देवी संस्थानची जबाबदारी तुला घ्यायला सांगितली आहे, असे अनंत तरे यांना सांगितले, अशा पद्धतीने अनंत तरे यांचा एकविरा मंदिर संस्थानामध्ये तसेच शिवसेनेत थेट प्रवेश झाला. पुढे अनंत तरे यांनी बँकेची नोकरी सोडली आणि एकविरा संस्थानात लक्ष घातले. सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ संस्थानचा कारभार पाहिला.
अनंत तरे यांनी एकविरा संस्थानचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यांनी प्रथम शिवसेनाप्रमुखांना एकविरा गडावर आणले व त्यांच्याहस्ते आपल्या कारभाराचा शुभारंभ केला. एकविरा देवी ही सीेकेपी समाजाची कुलदेवता म्हणून ओळखली जात होतीच त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व ठाकरे कुटुंबाचा गडावर वावर सुरु झाला आणि अल्पावधीतच एकविरा देवी ही ठाकरेंची देवी असल्याची प्रसिध्दीस पावली. त्यापूर्वी अनेकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तथा ठाकरे कुटुंब डहाणूजवळील कासा येथील श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला जात असत
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तथा ठाकरे कुटुंबाला एकविरा मंदिर परिसरात येण्याने तथा देवीच्या दर्शनाने मानसिक आणि शारिरीक बळ मिळत असल्याने त्यांचे कोणत्याही शुभप्रसंगी कार्ला एकविरा येथे येणे सुरु झाले. एकविरेचे मुळ स्थान रायगड जिल्ह्यातील वेरळ येथे आहे. तेथेही ठाकरे कुटुंबाने दर्शनासाठी अनेकदा भेटी दिल्याने ठाकरेंची देवी ‘एकविरा’ ही ख्याती संपूर्ण हिंदुस्थानात पसरली. आजही एकविरा गडावर गेल्यास किंवा एकविरा भक्तांशी चर्चा केल्यास ठाकरे कुटुंबाने गडावर वारंवार यावे म्हणजे गडावर काहीतरी चांगले घडेल अशी अपेक्षा अनेक भक्त व्यक्त करीत आहेत.
‘एक दिवस कायस्थांचा’ २०२० साली झालेल्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे आले होते. त्यांनी आपल्या भाषणात आपण एकविरा गडावर प्रथमच येत आहोत, तथापि आपली पत्नी व मुली नेहमी येतात, असे सांगून येथे येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांना फोन केला, तुमच्या देवीच्या दर्शनासाठी मी जात आहे. आपण आलात तर चांगले होईल, परंतु त्यासमयी अयोध्या दौरा असल्याने उद्धव ठाकरे येवू शकले नाहीत.
ठाकरेंची एकविरा ही प्रसिध्दी फक्त देवी भक्तांमध्ये नाही तर संपूर्ण देशात आहे. नव्वदीच्या दशकात कार्यक्रमानिमित्ताने मी कलकत्ता येथे गेलो होतो. तेथे सीकेपी म्हणजे काय ? हे अनेकांना समजलेच नाही. कायस्थ सांगितल्यावरही मोठे प्रश्नचिन्ह होते परंतु त्या समारोहात असलेल्या एका उच्चशिक्षित महिलेने ‘अरे वो बाल ठाकरेवाले सीकेपी कायस्थ हैं, एकविरा उनकी देवी हैं’ असे उत्स्फूर्तपणे सांगितले होते.
एकविरा मंदिर परिसरात सीकेपी समाजाचा खूप जुना वावर आहे. सुमारे सतराशे अठराशे सालातील अनेक संदर्भ सापडतात. पूर्वी गडावर सीकेपी समाजाची धर्मशाळा होती. सीकेपींची अनेक लग्न कोणत्याही सुविधा नसतांना एकविरा गडावर होत असत. पुढे कालांतराने समाजाचे दुर्लक्ष झाले आणि गडावरील सीकेपी धर्मशाळा शासन दरबारी जमा झाली.
एकविरा देवस्थान हे पांडवकालिन आहे. पांडव वनवासात असतांना एकविरा पांडवांसमोर प्रगट झाली व त्यांना एका रात्रीत देऊळ बांधण्याची अट टाकली. देऊळ बांधल्यानंतर एकविरा माता प्रसन्न झाली आणि पांडवांना वनवासात व अज्ञातवासात कोणीही ओळखू शकणार नाही असा वर दिला. एकविरा परिसरात असलेली कार्ला लेणी पहिल्या शतकातील शिल्पकला असल्याचे सांगण्यात येते. एकविरा मातेची मुर्ती ही स्वयंभू पाषाणापासून तयार केली आहे. नवसाला पावणारी स्वयंभू एकविरा गडावर स्थानापन्न असून बाजूला जोगेश्वरी देवी आहे. स्वयंभू असलेल्या देवीचा तिन्ही लोकी नावलौकिक आहे. भगवान परशुराम या वीरपुत्राची जननी, जमदग्नी ऋषींची पत्नी. त्या काळातील भगवान परशुराम एकमेव वीरपुत्र असल्याने देवीला ‘एक विरा’ या नावाने संबोधले जात असे. पुढे त्याचे नामकरण ‘एकविरा’ असे झाले. एकविरेंचे आणखी एक मंदिर कर्नाटकातही आहे.
पूर्वींचे हेमांडपंथी असलेल्या मंदिराचा जिर्णोद्धार १८६६ साली झाला. एकविरा भवानीचे जुने देवालय त्या काळातील एकविरेचे निस्सिम भक्त मुंबईतील बाबुराव कुळकर्णी या सीकेपी भक्ताने मुंबईतील नागू पोसू वरळीकर व हरिप्पाचेर नाखवा या दोघांच्या मदतीने माघ शुध्द पंचमीला बांधून जिर्णोद्धार केला. बाबुराव कुळकर्णी यांच्या पुढाकाराने हे देऊळ बांधल्याचा उल्लेख आहे. तसा शिलालेख एकविरा मंदिर परिसरात आजही आहे.
सीकेपी समाज हा प्रामुख्याने काश्मिर व पश्चिम बंगालमधून महाराष्ट्रात आला. प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात वास्तव्य असलेल्या या समाजाने जेथे वास्तव्य केले तेथील देवीला आपली कुलदेवता मानले. परंतु समाजाची कुलदेवता ही एकविरा असल्याचे अनेक कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले आहे. आपल्या कुलदेवतेचा उत्सव करावा ही संकल्पना पुढे आली. आणि त्यातूनच २०१७ सालापासून एकविरा गडावर ‘एक दिवस कायस्थांचा’ हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येतो. देशभरातील अनेक ज्ञातीबांधव या उत्सवात सहभागी होतात. आता ज्ञातींची विश्वस्त संस्था स्थापन करुन मंदिर परिसर किंवा आसपासच्या भागात सीकेपी समाजाची वास्तु उभारण्याचे काम यावर्षीच्या उत्सवापासून सुरु होणार आहे. सीकेपी, कोळी, आगरी, सोनार, त्वष्टाकासार इत्यादी समाजाची ही देवता म्हणून ओळखण्यात येते. त्याही पेक्षा ठाकरेंची देवी म्हणून देवीला एक वेगळेच नामाभिधान मिळाले आहे.
आजही एकविरा गडावर वृध्द मंडळींना जाणे जिकिरीचे आहे. गडाच्या पायऱ्या असमान असल्याने चढणे अवघड होते. अनंत तरे आमदार असतांना त्यांच्या आमदार निधीतून गडाच्या मध्यभागापर्यंत रस्ता तयार करण्यात आला. पायऱ्यांची दुरुस्ती करण्यात पुरातत्व खात्याची अडचण येते. आदित्य ठाकरे पर्यटनमंत्री असतांना गडावर रोप-वे करण्याची योजना मंजूर केली, त्यासाठी निधीही राखून ठेवला. काही स्थानिकांचा विरोध असल्याने रोप-वे होऊ शकला नाही, परंतु आता त्याचे काम मार्गी लागले आहे. एकविरा मंदिराची नोंद शासन दरबारी होवून ते पर्यटन स्थळ व्हावे यासाठी आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता.
एकविरा मंदिर हे पांडवकालिन असले तरीही ज्या समाजाची ही कुलदेवता आहे त्या समाजाला एकविरा विश्वस्त मंडळात कोणतेही स्थान मिळत नाही. संस्थानचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी त्याबाबतची व एकविरा मंदिर संस्थानची अयोग्य घटना बदलाची मागणी करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. ज्येष्ठ विधीज्ञ अजित ताम्हाणे या याचिकांसाठीचे काम पहात आहेत. तथापि अनंत तरे यांच्या पश्चात याचिकांबाबत योग्य पाठपुरावा नसल्याने त्या प्रलंबित आहेत. सीकेपी समाजाने सुरु केलेल्या ‘एक दिवस कायस्थांचा’ या उत्सवाने यापूर्वी एकत्र न येणारा समाज एकविरा उत्सवानिमित्ताने एकत्र येत आहे हेच ‘एक दिवस कायस्थांचा’ या उत्सवाचे यश आहे.
*-तुषार राजे, 7021320178 (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)*
फोटो कॅप्शन : कार्ला येथे एकविरा मंदिराच्या आवारातील शिलालेख
१) श्री एकविरा भवानीचे जुने देवालय
२) बाबुराव कुळकर्णी यांचे विचारे करून
३) नाग्ग पोसु वरलीकर व हरीप्पाचेरनाक
४) वा फजींदार मुकांम मुंबई याणे धर्म
५) दायक बांधीले असे मीति माघ शु II५
६) शके १७८८ क्षयनाम संवत्छर –
श्री एकविरा भवानीचे जुने देवालय सीकेपी भक्त बाबुराव कुळकर्णी यांच्या विचाराने नाग पोसू वरलीकर व हरिप्पाचेर नाकवा फजींदार मुक्काम मुंबई यांनी धर्मार्थ बांधले.
मिती माघ शुद्ध ५ शके १७८८ क्षयनाम संवत्सर.
लेखातली तारीख फेब्रुवारी महिना, सन १८६६ आहे.
(छाया : संकेत कर्णिक)




