
मुंबई : महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने, गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. रुग्णालयाची अवस्था जाणीवपूर्वक खराब ठेवून त्यांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे, असा गंभीर आरोप करत मुंबईतील सर्व सरकारी रुग्णालयांच्या कामकाजाची संपूर्ण चौकशी करा अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
खासदार वर्षा गायकवाड यांनी आज सांताक्रुझ येथील व्हि. एन. देसाई इथल्या महापालिकेच्या रुग्णालयाला भेट दिली. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, डॉक्टर रुग्णसेवा करतात की उपकार असे इथले वातावरण आहे. महापालिका रुग्णालयात गरीब कुटुंबातील लोक येतात म्हणून त्यांच्या अंगावर ओरडणे, नीट आरोग्यसेवा न देणे, बेड उपलब्ध असूनही त्यांना रुग्णालयाच्या पॅसेज मध्ये झोपायला लावणे अशा अनेक गोष्टी माझ्या नजरेस आल्या. आजारी रुग्णांशी सौजन्याने वागले जात नाही, रुग्णालयातील अनेक खोल्या, स्वच्छतागृह एक वर्ष बंद करून ठेवण्यात आल्या आहेत. गळणारे छप्पर, तुंबलेले शौचालय, पाण्याचा अभाव यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक विशेषतः महिलांना जास्त त्रासाला सामोरे जावं लागत आहे.
मुंबईतील सरकारी रुग्णालयांची काय अवस्था आहे हे पाहण्यासाठी महापालिका आयुक्तांनी स्वतः उपनगरीय रुग्णालयांना भेट दिली पाहिजे. रुग्णालयात सोयी सुविधा आहेत का, रुग्णांना कोणत्या अवस्थेत ठेवले जात आहे हे त्यांनी पहावे. आम्ही वारंवार तक्रारी करून देखील गोष्टी सुधारल्या का जात नाहीत? प्रशासन गेंड्याच्या कातडीचे आहे. रुग्णालयातील गलिच्छ अवस्थेसाठी मुंबई महापालिकाच जबाबदार आहे. कोट्यवधी रुपयांचे आरोग्य विभागाचे बजेट असताना तो पैसा कोणाच्या खिशात जातो, याची चौकशी झाली पाहिजे आणि तातडीने रुग्णालयात उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.




