ताज्या बातम्या

छबिलदास हायस्कूल, दादर येथे “नवनिर्मिती विचार क्षमता निर्माण करणे” या अभिनव उपक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी : जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छबिलदास हायस्कूल, दादर आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “नवनिर्मिती विचार क्षमता निर्माण करणे” या अभिनव उपक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा आज उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले . डॉ. काकोडकर यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांमधील परीक्षणाची तयारी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले.

इनोव्हेशन स्किल हा शब्द वापरण्यापेक्षा त्याचा मुळ गाभा समजून घेणे अत्यावश्यक आहे. सायंटिफिक टेम्पर जोपासणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. फक्त विज्ञान शिकून वैज्ञानिक दृष्टिकोन मिळत नाही, विचारांची पद्धत वैज्ञानिक असणे महत्त्वाचे आहे. समाजाची प्रगती केवळ ज्ञानाने नव्हे तर तर्कशुद्ध विचारांनीच होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, “विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती रुजविण्यासाठी असा उपक्रम हाती घेतल्याबद्दल ‘जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट’ (GEI) आणि ‘मराठी विज्ञान परिषदे’चे मनःपूर्वक अभिनंदन,” असे त्यांनी गौरवोदगार काढले.

पद्मभूषण प्रा. ज्येष्ठराज जोशी यांनी नवकल्पनांची खोली समजून घेण्यावर भर देत, “उत्तर शोधायचे असेल तर विषयाच्या मुळाशी पोहोचणे आवश्यक आहे. इनोव्हेशन म्हणजे कल्पनेला शेवटपर्यंत नेण्याची क्षमता,” असे मत व्यक्त केले.

यावेळी डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी विद्यार्थ्यांनी विकसित करावयाच्या प्रमुख कौशल्यांचा उल्लेख करताना सांगितले की, “कुतूहल, प्रत्यक्ष प्रयोग करण्याचे धाडस, वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पनाशक्ती, निर्णय क्षमता, निर्मितीशीलता, परीक्षणाची वृत्ती आणि ‘अंत्योदय ते सर्वोदय’ ही विनोबा भावे यांनी सुचविलेली एकात्म दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये जागी झाली पाहिजे.” GEI चे कार्याध्यक्ष श्री. शैलेंद्र साळवी यांनी संस्थेमार्फत या उपक्रमासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन दिले. तर उपाध्यक्ष डॉ. सुधीर पानसे यांनी विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीक्षम विचार, सखोल ज्ञान आणि जागरूकतेचे वातावरण निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. “नवीन गोष्ट सुरुवातीला कठीण वाटते, पण सातत्य ठेवल्यास ती परिपूर्ण होते,” असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. रविंद्र तामरस, उपकार्यवह महेश केळकर, संचालक मंडळाचे सदस्य, पदाधिकारी, जनरल एज्युकेशन व दादर परिसरातील विज्ञान शिक्षक तसेच छबिलदास इंग्लिश व मराठी माध्यमातील विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाचे नियोजन कार्यवाह श्री. विकास पाटील यांनी केले. सुत्रसंचालन सौ. अर्चना इशी व सौ. समृद्धी जगताप यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. रुपेश गायकवाड यांनी मानले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top