ताज्या बातम्या

मराठी माणूस एकजूट नसेल तर भविष्य कठीण; संयुक्त महाराष्ट्र घडवणाऱ्या हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देऊ नका — सुकृत खांडेकर (जेष्ठ पत्रकार)

नवी मुंबई : मराठी साहित्य संस्कृती व कलामंडळ – नवी मुंबई आणि शिवतुतारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने “संयुक्त महाराष्ट्राचा संग्राम : जिंकूनही हरलेली लढाई…” या विषयावरील हुतात्मा स्मृती दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५ रोजी साहित्य संघ मंदिर, वाशी येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला नवी मुंबई–ठाणे परिसरातील तब्बल १०७ मराठी सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदवत संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या १०७ हुतात्म्यांना ‘एक पणती हुतात्म्यासाठी’ या उपक्रमाद्वारे अभिवादन केले.कार्यक्रमाची सुरुवात सुरेख बासरीवादनाने झाली, त्यानंतर गीतकार,शाहीर मनोहर गोळुंबरे यांनी “माझी मैना गावाकडे राहिली…” हे फक्कड गीत सादर करून रसिकांची मने जिंकली. या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर, गोवर्धन देशमुख (मराठी एकीकरण समिती – महाराष्ट्र) आणि संजय यादवराव (शिव स्वराज्य मराठी लोक चळवळ) यांनी हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मराठी भाषा, संस्कृती, रोजगार आणि मराठी एकजुटीवर महत्त्वपूर्ण विचार मांडले.ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांनी मराठी समाजातील विस्कळीतपणावर कठोर भाष्य करताना सांगितले की, “मराठी माणसाची घुमसट होते… मराठी माणूस अडचणीत आल्यावरच त्याची चर्चा होते, हे दुर्दैव आहे. अभिजात दर्जा मिळून वर्ष झाले तरी मराठी भाषेसाठी काही ठोस झाल्याचे दिसत नाही. सरकारी पातळीवर मराठीचा प्रश्न ‘गुंडाळून’ ठेवला आहे.”

ते पुढे म्हणाले, “मुंबईत आज केवळ १८% मराठी लोक उरले आहेत… २०११ पासून याठिकाणी जनगणना नाही, मग सत्यस्थिती समजणार कशी? इतर राज्यांत मराठी माणसाला उमेदवारी दिली जात नाही, मग आपणच परप्रांतीयांना का निवडून द्यायचे? मराठी माणसाने आता एकजूट केली नाही तर भविष्य अत्यंत कठीण जाणार आहे.” सुकृत खांडेकर यांनी नवी मुंबईतील धोकादायक इमारती, टेंडर प्रक्रिया, प्रशासकीय निष्काळजीपणा यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“ज्या हुतात्म्यांनी बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र घडविला, त्यांचे स्वप्न आपण सांभाळले पाहिजे. एकत्र या, मराठीसाठी काहीतरी करा, आम्ही पत्रकार म्हणून तेच अपेक्षित असल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहतो आणि लिहितो.
गोवर्धन देशमुख यांनी मराठी भाषा घरातूनच रुजवण्याचे महत्व सांगितले, तर संजय यादवराव यांनी शिवरायांची परंपरा, शाहू–फुले–आंबेडकरांचा वारसा आणि मराठी व्यवसायिकांच्या समस्यांवर सखोल उल्लेख केला. कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरले, नवी मुंबईतील सर्व मराठी संस्थांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या १०७ हुतात्म्यांना सामुदायिक दीपप्रज्वलनाने अभिवादन करण्याचा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन मराठी साहित्य संस्कृती कलामंडळाचे सुभाष कुलकर्णी आणि शिव तुतारी प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील यांनी केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश पालेकर, रमेश संकपाळ, विलास समेळ, कल्पना देशमुख, श्रीहरी पवळे, राजेंद्र मोरे, मनिषा पाटील, ज्योती माळी, इत्यादींनी अधिक मेहनत घेतली . नारायण लांडगे पाटील आणि शंकर गोपाळे यांनी सुत्रसंचलन केले.
📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top