कराड(प्रताप भणगे) : कराड दक्षिण पाचवड फाटा ते येळगाव फाटा या मार्गावर महावितरण विभागाकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना डांब (वीज खांब) उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र या कामादरम्यान महावितरणच्या ठेकेदारांनी मधोमध येणारी हिरवीगार झाडे निर्धास्तपणे कापून टाकण्याचा धक्कादायक प्रकार केल्याचे उघड झाले आहे.
एक झाड उभे राहण्यासाठी कित्येक वर्षांची वाढ, पाऊस–वारा–ऊन सहन करण्याचा प्रवास आवश्यक असतो. परंतु ठेकेदारांनी क्षणाचाही विलंब न करता झाडे मधूनच तोडण्याचा पराक्रम केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
या संपूर्ण प्रकारा दरम्यान संबंधित महावितरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग वा मार्ग प्रकल्प विभाग झोपेच्या भूमिकेत होते का? असा सवाल सर्वत्र उपस्थित केला जात आहे.
“सामान्य नागरिक झाड तोडल्यास लाखोंचा दंड; ठेकेदारांना सूट का?”
सर्वसामान्य नागरिकाने एक झाड तोडले तरी वनविभाग लाखो रुपयांचा दंड आणि गुन्हा दाखल करतो. मग सरकारी विभागाच्या कामावर असलेल्या ठेकेदारांनी झाडांवर कुरघोडी केली तर कायदा वेगळा का?
कायदा फक्त सर्वसामान्यासाठीच आहे का? ठेकेदार आणि शासकीय अधिकारी–कर्मचारी कायद्यापलीकडे आहेत का? अनधिकृत झाडतोड झाली तर वनविभाग कोणती भूमिका घेणार? झाडांची तोड न करता नियोजनशून्य काम का सुरू होते?झाडे तोडण्याचा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी कडक प्रतिक्रिया देत सांगितले की, “झाडा तुला शोधू कुठे… अशी अवस्था या विभागातील वृक्षांची होत आहे.
स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, मार्ग प्रकल्प विभाग, वनविभाग तसेच महावितरण विभागाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी आणि ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर तसेच आर्थिक दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
झाडे तोडण्याचा प्रकार थांबवून पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य देण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली असून, या गंभीर प्रकरणाचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




