Tuesday, November 11, 2025
घरमहाराष्ट्रकोकण मराठी साहित्य परिषदेचे वार्षिक पुरस्कार वितरण उत्साहात संपन्न

कोकण मराठी साहित्य परिषदेचे वार्षिक पुरस्कार वितरण उत्साहात संपन्न

मालगुंड : कोकणात शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण होत आहे. परिणामी त्यांच्या माध्यमातून संपूर्ण कोकणात साहित्य चळवळ प्रवाही बनली आहे. ही चळवळ दृढ होण्यामागे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची मोलाची भूमिका असून, त्यांनी स्थापन केलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेने या साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याने, कोकणातील साहित्यिक चळवळ वृद्धिंगत होण्यात कोकण मराठी साहित्य परिषदेचे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे विधानसभा सदस्य तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त संजय केळकर यांनी काढले.
ते कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कवी केशवसुत स्मारक मालगुंड याठिकाणी संपन्न झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेसारखी संस्था उभारून माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना साहित्य क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. साहित्याचा विचार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी संस्थेच्या माध्यमातून रुजवला. परिणामी हाच साहित्यिक विचार सर्वदूर पसरला. एवढेच नव्हे तर साहित्यिकांना त्यांच्या साहित्यकृतीसाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुरस्कार दिले जात आहेत, ही या साहित्यिकांच्या पाठीवर दिलेली थाप त्यांना कायमस्वरूपी प्रेरणादायी ठरणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचे कवी केशवसुत स्मारक हे अजूनही अत्याधुनिक स्वरूपामध्ये व्हावे यासाठी व्यवस्थापनाने आवश्यक त्या कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव शासन दरबारी सादर करावा. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे योग्य प्रयत्न करून कवी केशवसुतांचे स्मारक हे जागतिक दर्जाचे होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मत त्यांनी व्यक्त करून सर्व साहित्यिकांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन झाल्याच्या नंतर आधुनिक मराठीचे कवी कविवर्य केशवसुत आणि विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमांना वंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन पाटील यांनी करताना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याचे महत्त्व सांगून कोकण मराठी साहित्य परिषदेचा कविता राजधानी हा पुरस्कार कवितेच्या राजधानीतच झाला पाहिजे ही विनंती या ठिकाणी व्यक्त केली. मधुभाई यांनी स्मारक उभारल्याच्या नंतरची वाटचाल, साहित्यिक पुरस्काराची वाटचाल त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगून कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. तसेच शासनाने या स्मारकाच्या अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असणारे केंद्रीय कार्याध्यक्ष प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून मराठी भाषेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर साहित्य संमेलन मॉरिशस या देशांमध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने संपन्न झाले असून, याचा साहित्यिक म्हणून सभासद म्हणून मला अभिमान असल्याचे मत व्यक्त केले. त्यासोबतच भविष्यातही अनेक देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर साहित्य संमेलन घेण्याचे प्रस्ताव, कोकण मराठी साहित्य परिषदेकडे आले असून, त्यावर लवकरच सकारात्मक विचार करून, त्या – त्या ठिकाणी अशी साहित्य संमेलने भरविण्याचा मनोदय व्यक्त केला.
यावेळी उपस्थित असणाऱ्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनीसुद्धा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार साहित्यकृतीला वा आपल्या कार्याला जाहीर होणे, हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप मोठा सुवर्णक्षण असून, तो क्षण आज या निमित्ताने अनेक पुरस्करार्थी साहित्यिकांचा पूर्ण होत असल्याची माहिती दिली. कोमसापचे वाढते कार्य पाहून अनेक साहित्यिक, लेखक, कवी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून पुढे येत असल्याची माहिती देऊन संस्थेचा अध्यक्ष या नात्याने ही बाब संस्मरणीय असल्याची ग्वाही दिली.
विश्वस्त प्रा. एल. बी. पाटील यांनीही यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये कोणत्याही अपेक्षेशिवाय काम केल्यास आपल्याला हवे ते मिळत असते. साहित्य क्षेत्रातही प्रामाणिकपणे लेखन केल्याच्या नंतर योग्य वेळी विविध संस्था, शासकीय स्तरावर, निमशासकीय स्तरावर त्याची दखल घेतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा पुरस्कार वितरण सोहळा असल्याचे मत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील मयेकर यांनीही भविष्यात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या उपक्रमासाठी सकारात्मक सहकार्य करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रसंगी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या झपुर्झा या मुखपत्राच्या दिवाळी अंकाचे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे श्रीकांत रानबरे यांच्या नारायण प्रभा, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्तीचे दक्षिण कोकण प्रमुख अरुण तुकाराम मोर्ये यांच्या अस्वस्थ मनाच्या कविता या कवितासंग्रहाचे आणि पालघर शाखेचे सभासद श्री. रमेश पाटील यांच्या तोडू अंधाराचे जाळे या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, ललित गद्य, वैचारिक, संकीर्ण, आत्मचरित्र, चरित्र या विभागासाठी प्रथम व द्वितीय क्रमांकाची पुरस्कार कोकणातील विविध साहित्यिकांना प्रदान करण्यात आले. त्यासोबतच कोकण मराठी साहित्य परिषद अंतर्गत कविता राजधानी पुरस्कार, कोकण साहित्य भूषण, श्री. बा. कारखानीस पुरस्कार, कै. भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार यासह विविध साहित्येतर पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी पुरस्कारार्थी यांना सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्प आणि रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र गीत, कार्यक्रमाच्या सांगतेला पसायदान गायन करण्यात आले. शेवटी सामूहिक वंदे मातरम म्हणण्यात आले.
यावेळी य कार्यक्रमाला मालगुंड गावच्या सरपंच श्वेता खेऊर, सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रतिनिधी, विविध समित्यांचे समिती प्रमुख, साहित्यप्रेमी, साहित्यिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन पाटील, नलिनी खेर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रा. आनंद शेलार, विलास राणे, रामानंद लिमये, शेखर खेऊर, रवींद्र मेहेंदळे, अरुण मोर्ये, अमेय धोपटकर, वैभव पवार, शुभदा मुळ्ये, उज्ज्वला बापट, मृदुला केळकर, हनुमंत कदम, यांच्यासह कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड आणि कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती सदस्य, स्मारक कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा