मुंबई(संतोष कदम) : सार्वजनिक नाईट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, माहीम मुंबई या शाळेतर्फे मराठी भाषा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध परंपरा आणि साहित्यिक वारसा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेवरील भाषणे, कविता सादरीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. शिक्षकांनी मराठी भाषा ही आपल्या ओळखीचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत तिचे जतन आणि संवर्धन करण्याचे आवाहन केले.
मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतात मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे तसेच दैनंदिन व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल आदर आणि आत्मीयता अधिक दृढ झाली.




