मुंबई : राज्यसभेच्या एका जागेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या एकमेव जागेसाठी माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव सध्या आघाडीवर मानले जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात शेवाळे यांनी घेतलेली मेहनत आणि संघटन कौशल्यामुळे त्यांना राज्यसभेची संधी मिळू शकते, अशी पक्षांतर्गत चर्चा आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून शेवाळे यांचा निसटता पराभव झाला होता. मात्र 2022 मधील शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी शिंदे यांच्यासोबत ठाम भूमिका घेतली. खासदारांचा गट शिंदे यांच्यासोबत नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या निष्ठेचे फळ म्हणून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यास पक्ष नेतृत्व सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत.
शेवाळे यांनी महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले असून त्यांना दिल्लीतील राजकारणाचा आणि संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. संसदेत पक्षाची प्रभावी बाजू मांडण्यासाठी अनुभवी चेहरा आवश्यक असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे.
दरम्यान, या जागेसाठी माजी खासदार गजानन कीर्तीकर ,आनंदराव अडसूळ तसेच उत्तर भारतीय नेते संजय निरुपम हेही इच्छुक असल्याचे समजते. या चारही नेत्यांत सध्या पडद्यामागे हालचाली सुरू आहेत.
तथापि, दोन वेळा खासदार राहिलेला अनुभव, महापालिका निवडणुकीतील योगदान आणि शिंदे यांच्याशी असलेली निष्ठा या सर्व बाबी लक्षात घेता राज्यसभेसाठी शेवाळे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. तमाम शिवसैनिकांचीही हीच अपेक्षा असून अंतिम निर्णय शिंदे घेणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष त्याकडे लागले आहे.




