मुंबई : बुरी नजर वाले तेरा मुह काला, विधानसभा चुनाव में धो डाला, अब पालिका में पडेगा फिरसे पाला, लेकिन महायुती के गले मे पडेगी फिर से माला” अशा चारोळ्यांनी विरोधकांवर निशाणा साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृह दणाणून सोडलं.
यशवंतराव चव्हाण सभागृहात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित ‘दाही दिशा’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या कार्याने राज्याला दिशा मिळाली असून, ‘दाही दिशा’ हे पुस्तक पुढील पिढीला प्रेरणा देईल, असा विश्वासही शिंदेंनी व्यक्त केला.
या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, सिने अभिनेत्री निवेदिता सराफ, सकाळचे संपादक राहुल गडपाले, आशुतोष रामगीर, अंकित काळे, राजन साळवी, संजय मोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर राजकीय फटकारा देत महायुतीची पुढील निवडणुकांतील यशस्वी वाटचाल निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. नीलम गोऱ्हे यांचे नाव घेताच टाळ्यांचा कडकडाट झाला त्यातच शिंदे भाषणाला सुरुवात करत म्हणाले “नीलम गोऱ्हे म्हणजे महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीचे आजचे जाज्वल्य रूप.”
यानंतर शिंदे यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांचा गौरव करत यादृच्छिक नव्हे तर भावनिक सुर पकडला. “नीलम गोऱ्हे माझी लाडकी बहीण. आंदोलनं, तुरुंग, सामाजिक संघर्ष… त्यांनी आयुष्यभर महिलांसाठी रस्त्यावर उतरून लढा दिला. महिलांच्या सन्मानासाठी आणि स्वाभिमानासाठी त्यांच्या लढाईला महाराष्ट्र सलाम करतो,” असे ते म्हणाले. गोऱ्हे यांनी सामाजिक न्याय, बालिकांच्या सुरक्षेसाठी, स्त्री आरक्षण, संघटनात्मक शक्ती यासाठी केलेल्या कामाचा विशेष उल्लेख त्यांनी केला. “बाळासाहेबांसोबत राहून बदलासाठी झटणं म्हणजे धाडस आहे हे नीलम ताईंनी ते साध्य केलं,” असा त्यांचा गौरवोद्गार होता.
महिला कल्याणाच्या योजनांचा आढावा घेत शिंदे म्हणाले, “मी शब्द देतो, तो पाळतो. बहिणींची सेवा ही माझी जबाबदारी आणि प्रामाणिक बांधिलकी आहे.” महिलांना मिळणाऱ्या ५०% एसटी सवलतीचा थेट परिणाम घरोघरी दिसतोय, मुलींच्या शिक्षणासाठी शंभर टक्के फी माफीमुळे हजारो परिवारांवरचा आर्थिक ताण हलका झाला आहे, पिंक रिक्षा योजनेतून महिलांना सुरक्षित रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत, तर बचतगटांना दिलेल्या भक्कम मदतीमुळे स्वतःवर विश्वास ठेवून उभं राहणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. “योजना कागदावर नाहीत, त्या राबवल्या जात आहेत. हे आमचं दिलेलं वचन आणि काम दोन्ही आहे,” असंही ते म्हणाले.
राज्यातील सत्तांतराच्या काळात आसाम प्रसंगांची आठवण करून देताना शिंदे भावूक झाले. “ते दिवस सोपे नव्हते. जनतेच्या डोळ्यातलं विश्वासाचं पाणी आणि माझ्या सोबत उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांचं धैर्य हाच माझा आधार होता. आसामच्या त्या रात्रीपासून आजवर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही पाऊल टाकलं,” असं ते म्हणाले. काहींचा गरज पडली की विचार बदलतो, आम्ही तसं केलं नाही, असं सूचक विधान करत त्यांनी विरोधकांना टोला लगावला “काही लोक चुकीच्या दिशेला पाहत राहिले, आम्ही योग्य दिशा निवडली. जनता आज त्याचं फळ देतेय,”असे ही ते म्हणाले.
शहाजी बापू पाटील यांच्या डायलॉग फेमस झाला होता. त्याची आठवण करून देताना शिंदे म्हणाले, त्या डायलॉगची रॉयल्टी शहाजी बापूंना मिळायला हवी. त्यांच्यामुळेच आसामचे पर्यटन वाढले आहे. याबाबत मी तेथील मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, असे सांगता सभागृहात हशा पिकला.
आगामी पालिका निवडणुकांचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “विधानसभेत जनता आमच्यासोबत होती, पालिकेतही महाराष्ट्राचं जनमत महायुतीसोबतच असणार. पुन्हा एकदा आम्ही जनतेच्या आशीर्वादाने विजयी होऊ. पाला विरोधकांनाच पडणार आणि माळ महायुतीच्या गळ्यातच पडणार”असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
