Lमुंबई : राज्यात वाढत्या बिबट्यांच्या मानवी हल्ल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्यासाठी वनमंत्री मा. गणेशजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला आंबेगाव-शिरूरचे आमदार दिलीपराव वळसे पाटील, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे तसेच इतर स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत बिबट्यांच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी अनेक महत्त्वाचे आणि ठोस निर्णय घेण्यात आले :
• पुढील सहा महिन्यांत 500 ते 700 बिबटे वनतारा, गुजरात येथे स्थलांतरित करण्यात येणार.
• पिंजरे खरेदीसाठी शासनाकडून 10 कोटींचा तात्काळ निधी मंजूर.
• आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित सायरन सिस्टम ठिकठिकाणी बसवली जाणार.
• नरभक्षी बिबट्यास मारण्यासाठी परवानगीची मुदत वाढविण्याचा निर्णय.
• बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी राज्य शासनाचे शिष्टमंडळ केंद्रीय वनमंत्रींना भेटणार.
• ‘बिबट सफारी पार्क’ प्रकल्पासाठी सेंट्रल झू ऑथॉरिटीकडून परवानगी मिळविण्याचे ठरले.
• आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर तालुक्यांत वन कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार.
बैठकीदरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्याचे वन सचिव श्री. म्हैसकर यांना तातडीने पिंजरे खरेदीसाठी आणि सायरन प्रणालीच्या स्थापनेसाठी निधी वितरित करण्याचे आदेश दिले. तसेच बिबट्यांमुळे वाढणाऱ्या धोक्यांचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ केंद्रीय वनमंत्र्यांशी नवी दिल्ली येथे चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, पिंपरखेड परिसरातील नरभक्षी बिबट्यासाठी देण्यात आलेली एक दिवसाची परवानगी वाढविण्यात आली आहे.
बैठकीत आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी मंजूर केलेल्या निर्णयांची तात्काळ तसेच दीर्घकालीन अंमलबजावणी करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.
या निर्णयांमुळे राज्यात बिबट्यांच्या हालचालींवर नियंत्रण येईल, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा जीवितधोका मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
