बहे(विजया माने) : क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त तसेच गणेश शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त बहे पंचक्रोशीमध्ये विविध सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश गरजू व आर्थिक दृष्ट्या मागास घटकांपर्यंत मदतीचे हात पोहोचवणे हा होता.
यावेळी गरीब आणि गरजू मुलांना वही, पुस्तक आणि पेनचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून डोळे तपासणी, बीपी, शुगर, थायरॉईड आणि शारीरिक चाचण्या करण्यात आल्या. तसेच वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आणि विविध सामाजिक योजना राबविण्यात आल्या. कार्यक्रम बहे खरातवाडी, बोरगाव आणि स्थानिक शाळांमध्ये पार पडला.
या उपक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्य बळीराजा संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. उमेश देशमुख, बळीराजा शेतकरी संघटनेचे खजिनदार चंद्रकांत यादव, शेतकरी संघटनेचे शहाजी पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे अशोक सलगर, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे हमीद हसनमुल्ला, रघुनाथ दादा शेतकरी संघटनेचे तुकाराम कारंडे, सुमित सलगर (एनसीपी अजितदादा गट), सुनील पाटील (बीजेपी), शंकर पाटील, शिवसेनेचे आर. पी. पाटील यांच्यासह सर्वपक्षीय शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
हजारो महिला व ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी आणि विविध योजनांचा लाभ घेतला. यावेळी गणेश शेवाळे यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने पुस्तकांचे वाटप आणि जेवणाचा आस्वाद घेत अनेकांनी सहभाग नोंदविला. बहे पंचक्रोशीतील नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले.