सातारा(नितीन गायकवाड) : दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) यांच्या नेतृत्वाखाली १७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता देशभरातील सर्व मंत्रालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी सातारा येथे नियोजन बैठक संपन्न झाली.
बैठकीचे अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा अध्यक्ष आयु. अशोक भालेराव होते. त्यांच्यासोबत कोषाध्यक्ष सचिन आढाव, सरचिटणीस दिलीप फणसे तसेच तालुका अध्यक्ष व सचिव, केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, समता सैनिक व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाबळेश्वर, वाई, सातारा, जावली, पाटण, कराड, कोरेगाव आदी तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
या बैठकीत महाबोधी महाविहार बोधगया मुक्ती, महू जन्मभूमी आणि नागपूर दीक्षाभूमीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्वोच्च न्यायालयात दिनांक ०२/०८/२०२५ रोजी दाखल करण्यात आलेल्या बौद्ध इंटरवेंशन याचिकेला समर्थन देण्याचा ठराव करण्यात आला.
राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मिराताई आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन डॉ. हरिष रावलिया, रिपोर्टिंग चेअरमन अॅड. सुभाष जौंजाळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भिमरावसाहेब य. आंबेडकर आणि राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय प्रकाश व बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
सर्व बौद्ध बांधवांनी, समविचारी संस्था व संघटनांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून अस्मितेच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन आयु. अशोक भालेराव यांनी केले.