मुंबई : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार लक्ष्मीदास बोरकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त येत्या शनिवार दि. ५ एप्रिल२०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गोवा मुक्तीसंग्रामाच्या प्रारंभ काळात या लढ्याचे प्रणेते डॉ. राम मनोहर लोहिया यांना , पोर्तुगीज सोजिरांच्या कडेकोट बंदोबस्ताची कडी तोडून मडगावच्या आझाद मैदानात घेऊन येण्याची किमया लक्ष्मीदास बोरकर यांनी केली होती. मडगावच्या त्याच जाहीर सभेत डॉ.लोहियांनी गोवा मुक्ती लढ्याचे रणशिंग फुंकले होते. पत्रकार म्हणून जवळ जवळ अर्धशतकभर कार्यरत असलेल्या बोरकर यांनी जनसामान्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. बोरकर यांनी मुंबईच्या दै.लोकसत्तामधून तसेच पणजी गोवा येथील दै.नवप्रभाचे संपादक म्हणून ध्येयवादी पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला. ते मुंबई मराठी पत्रकार संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते.
मुंबई मराठी पत्रकार संघ आणि लक्ष्मीदास बोरकर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी होणाऱ्या या सोहळ्याला केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून प्रख्यात शल्यविशारद डॉ.प्रेमानंद रामाणी सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. दै.नवशक्तिचे माजी संपादक प्रकाश कुलकर्णी आणि दै.नवप्रभाचे माजी संपादक सुरेश वाळवे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हा सोहळा सर्वांना खुला असून त्यात पत्रकार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे बोरकर शताब्दी सोहळा समितीचे कार्यवाह डॉ.नितीन बोरकर आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी आवाहन केले आहे.