मुंबई(मंगेश कवडे) : सप्टेंबर महिना संपण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर १ ऑक्टोबरपासून अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या स्वयंपाकघरावर आणि तुमच्या खिशावर होऊ शकतो. यामध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपासून क्रेडिट कार्डपर्यंत आणि सुकन्या समृद्धी, तसंच पीपीएफ खात्याच्या नियमांमधील बदलांचा समावेश आहे.

इंधन कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमती बदलतात आणि सुधारित किंमती १ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून जारी केल्या जाऊ शकतात. यापूर्वी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत अनेक बदल दिसून आले असले तरी १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
सीएनजी-पीएनजीचे दर – देशभरात महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्याबरोबरच इंधन कंपन्या विमान इंधन म्हणजेच एअर टर्बाइन फ्यूल (एटीएफ) आणि सीएनजी-पीएनजीच्या किंमतीतही बदल करतात. १ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांच्या नवीन किंमती देखील जाहीर केल्या जाऊ शकतात. विशेष म्हणजे याआधी सप्टेंबरमध्ये एटीएफच्या दरात कपात करण्यात आली होती. एचडीएफसी क्रेडिट कार्ड - तिसरा बदल एचडीएफसी बँकेशी संबंधित आहे. जर तुम्हीही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर काही क्रेडिट कार्डसाठी लॉयल्टी प्रोग्राममध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन नियम १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू होतील.
सुकन्या समृद्धी योजना – विशेषत: मुलींसाठी राबविण्यात येणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेशी संबंधित केंद्र सरकारकडून मोठा नियम बदल करण्यात आला असून हा बदल १ ऑक्टोबर २०२४ पासून अमलातही येणार आहे. याअंतर्गत मुलींच्या कायदेशीर पालकांनाच पहिल्या तारखेपासून ही खाती ऑपरेट करता येणार आहेत. नव्या नियमानुसार, जर एखाद्या मुलीचं एसएसवाय खातं तिचे कायदेशीर पालक नसलेल्या व्यक्तीनं उघडलं असेल तर तिला आता हे खाते नैसर्गिक पालक किंवा कायदेशीर पालकाकडे हस्तांतरित करावं लागेल. तसं न केल्यास ते खातं बंद केलं जाऊ शकतं.
पीपीएफ खातं – पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) योजनेत तीन मोठे बदल होणार आहेत. हा बदल १ ऑक्टोबर २०२४ पासून म्हणजेच पुढील महिन्यापासून लागू होणार आहे. २१ ऑगस्ट २०२४ रोजी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागानं नवीन नियमांसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वं जारी केली, ज्याअंतर्गत पीपीएफचे तीन नवीन नियम लागू केले जातील. याअंतर्गत एकापेक्षा अधिक खाती असलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसंच अशा अनियमित खात्यावरील पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटचं व्याज व्यक्ती खातं उघडण्यास पात्र होईपर्यंत भरलं जाईल. म्हणजेच व्यक्तीचे वय १८ वर्षे झाल्यानंतरच पीपीएफचा व्याजदर दिला जाईल.