प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरधून पैशांच्या बॅगा नेण्यात आल्या, असा आरोप विरोधकांनी केला होता. याबाबत आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्रकार परिषेदत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, सर्वांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सर्वांच्याच हेलिकॉप्टरची तपासणी करण्यासाठी जराही मागेपुढे पाहू नये, असेही सांगितले गेले आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, त्यांची बदली करण्यात यावी, असेही निर्देश दिले असल्याचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुका कधी होणार, याचीही माहिती त्यांनी दिली.
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटविण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाचे मत काय आहे? असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राजीव कुमार म्हणाले की, ज्या अधिकाऱ्यांना विद्यमान पदावर तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांची तात्काळ बदली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मग ते कोणत्याही विभागाचे अधिकारी असले तरीही त्यांना हटविण्यात यावे.
मात्र कोणत्याही पक्षाच्या वैयक्तिक तक्रारीला आम्ही ग्राह्य धरत नाहीत. आमच्याकडे लेखी तक्रारी आल्या आहेत. पण आचारसंहिता अद्याप लागू झालेली नाही. जेव्हा आचारसंहिता लागू होईल, तेव्हा आम्ही अशा तक्रारी आल्या तर त्यावर त्या वेळी निर्णय घेऊ.
राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबद्दल काय म्हणाले?
निवडणूक आयोगाने राजकीय चिन्हांबाबत आधीच निर्णय दिलेले आहेत. ज्या पक्षांचे दोन गट आहेत, त्यांना आम्ही त्यांच्या विनंतीनुसार इतर चिन्ह दिले आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यांच्या चिन्हाबाबत आताच काही सांगू शकत नाही, असे राजीव कुमार म्हणाले.
महाराष्ट्रात निवडणुका कधी होणार?
विद्यमान महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका २६ नोव्हेंबर पूर्वीच पार पडतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले. मात्र त्यांनी यावेळी निश्चित तारीख सांगितली नाही.
