प्रतिनिधी : शिराळा, पाटण आणि कराड दक्षिण तालुक्यातील डोंगरपट्ट्यात पाण्याच्या कायमस्वरूपी टंचाईने त्रस्त झालेल्या १०६ गावांतील शेतकऱ्यांचा उपसा सिंचन प्रकल्पांसाठीचा लढा निर्णायक टप्प्यात पोहोचत आहे.
स्वातंत्र्यानंतर तब्बल ७८ वर्षे उलटूनही या डोंगराळ क्षेत्रात ना सिंचनाची सोय झाली, ना उन्हाळ्यात पिण्याचे पाणी उपलब्ध राहिले. या मूलभूत प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांनी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारक, मणदूर (ता. शिराळा) येथे तब्बल ३८ दिवस बेमुदत आंदोलन केले होते.
या आंदोलनाच्या दबावामुळे शासनाने दोन महत्त्वाच्या उपसा सिंचन योजनांची — करुंगली व मोहरे (ता. शिराळा) — प्राथमिक आखणी मंजूर केली. शिराळ्यातील ७३, पाटणमधील १० आणि कराड तालुक्यातील २३ अशी एकूण १०६ गावे लाभक्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी १ कोटी ६५ लाख ४२ हजार रुपयांचा सर्व्हे निधी मंजूर झाला असून ड्रोन सर्व्हेही सुरू करण्यात आला.
मात्र काही गावांचा सर्व्हे अद्याप न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यासाठी खालील मागण्या पुन्हा तीव्र होत आहेत—
● राहिलेल्या गावांचा सर्व्हे तातडीने पूर्ण करावा
● दोन्ही उपसा सिंचन योजनांना तातडीने प्रशासकीय मंजुरी द्यावी
● बंद पाईप लाईनची कामे त्वरित सुरू करावीत
या मागण्यांसाठी आणि पुढील लढ्याची दिशा ठरवण्यासाठी रविवार, ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता घोगाव (ता. कराड) येथील संतकृपा मंदिरात भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याचे अध्यक्षस्थान डॉ. भारत पाटणकर भूषवणार असून श्रमिक मुक्ती दल–शिराळा, पाटण, कराड तालुका पाणी संघर्ष चळवळीतर्फे सर्व गावांतील शेतकरी, महिला, तरुण-तरुणींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




