मुंबई(भीमराव धुळप) : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या प्राथमिक यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि अनियमितता आढळून आल्याचा काँग्रेसकडून गंभीर आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी धारावी परिसरात तब्बल ७०,००० मतदारांची वेगवेगळ्या वॉर्डमध्ये हेराफेरी, तसेच अनेक नागरिकांची नावे दोन ते तीन ठिकाणी आढळल्याचे उघड झाले होते.
या पार्श्वभूमीवर आज मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगात आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली.
चर्चेदरम्यान मतदार यादीतील गोंधळ, विसंगती, नावांची चुकीची नोंद, डुप्लिकेट नोंदी आदी मुद्द्यांवर काँग्रेसने आयोगाचे लक्ष वेधले.
बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून उद्या निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि मुंबई महानगरपालिका प्रशासन यांच्यात संयुक्त बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत मतदार याद्यांची दुरुस्ती, पडताळणी व पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा होईल.
मतदारांची हेराफेरी हा लोकशाही प्रक्रियेवर आघात असल्याचे सांगत काँग्रेसने यावर कठोर भूमिका घेतली आहे.
“काँग्रेस मुंबईत ‘मत’ चोरी होऊ देणार नाही. प्रत्येक मताचा सन्मान आणि संरक्षण करण्यासाठी काँग्रेस लढत राहील,” असे विधान काँग्रेस आमदार डॉ. ज्योतीताई गायकवाड यांनी केले.
काँग्रेसच्या या हालचालीमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबतची चर्चा पुन्हा एकदा चांगलीच गतीमान झाली आहे.




