मुंबई : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या आणि नागरिकांचे – जीवनमान उंचावणाऱ्या धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या झोपड्यांच्या सर्वेक्षणात ९६३० झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. धारावीतील झोपड्यांचे इन सर्वेक्षण सुरू असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता रहिवाशांकडून सर्व्हेसाठी सहकार्य मिळत असल्याचे सर्वेक्षण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. सर्वेक्षण झालेल्या ९ हजार ६३० पैकी २ हजार ८१५ झोपड्या रेल्वेच्या भूखंडावरील असून, ६८१५ सेक्टर ५ तसेच परिसरातील असल्याचे सांगण्यात आले आहे. रेल्वेच्या ४५ एकर भूखंडांपैकी २७ एकर भूखंड ताब्यात देण्यात आले असून, उर्वरित भूखंड लवकरच ताब्यात मिळेल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. धारावीत सर्वेक्षण झालेल्या झोपड्यांमध्ये ८४६१ गाळे निवासी, २०४ अनिवासी, २१ निवासी-अनिवासी, १२ धार्मिक, १५ सामाजिक रचना यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

तर म्हाडाने पूर्वी बांधलेल्या धारावीतील घरांमध्ये ३५३ जणांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. उर्वरित घरांमध्येही रहिवाशांना स्थलांतरीत करण्यासाठी सर्वेक्षणानंतर पात्र ठरणाऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड अर्थात डीआरपीपीएलच्या माध्यमातून म्हाडाच्या घरांचे ४१८ कोटी रुपये बांधकाम शुल्क येत्या काही दिवसांत देण्यात येणार आहे. विशेष अत्यावश्यक नागरी उत्थान प्रकल्प म्हणून धारावीतील पात्र रहिवाशांना ३५० चौ. फुटांचे घर मिळणार असून, सर्वेक्षणासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अटींचे पालन करण्यात येत आहे.