नवी मुंबई : कोपरखैरणे, सेक्टर १८ येथे गेली २८ वर्षे वास्तव्य असलेले शिक्षणप्रेमी, पत्रकार व समाजसेवक श्री. वसंत काशिनाथ जाधव (सर) यांना धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह, सेक्टर ४-५, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
बी.एस्सी. पदवीधर असलेल्या वसंत जाधव यांनी १३ वर्षे खाजगी क्लासेस तर १० वर्षे दै. धावते नवनगरमध्ये पत्रकारिता केली आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग नेहमीच उल्लेखनीय राहिला आहे. नवी मुंबईतील पहिली एसएससी व्याख्यानमाला आयोजित करण्यापासून ते सलग अनेक वर्षे शैक्षणिक मार्गदर्शन उपक्रम राबवण्याचे कार्य त्यांनी केले.
कोविड-१९ काळात मास्क, धान्य किट्स वाटप, लसीकरण, ई-पासेस, आरोग्यसेवा, रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा, स्वच्छता व विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. महापालिकेकडे ४५ पेक्षा अधिक निवेदने देऊन प्रश्न मार्गी लावणारे वसंत जाधव हे खऱ्या अर्थाने जनसेवेचे प्रतीक ठरले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल म्हणून समाज गौरव पुरस्काराने सन्मान होत असल्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.




