Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रनागपूर, विदर्भपत्रकार संवाद यात्रेचे 28 जुलैपासून राज्यव्यापी वादळ घोंगावणार;दीक्षाभूमी ते मंत्रालय सवांद,पत्रकार विचारवंत...

पत्रकार संवाद यात्रेचे 28 जुलैपासून राज्यव्यापी वादळ घोंगावणार;दीक्षाभूमी ते मंत्रालय सवांद,पत्रकार विचारवंत सहभागी होणार


मुंबई (प्रतिनिधी) :  लोकशाहीच्या बळकटीसाठी, पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईची दीक्षाभूमी- नागपूर ते मंत्रालय-मुंबई अशी राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रा रविवार दि.28 जुलैपासून प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रारंभ होत आहे. अशी माहिती सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांनी दिली आहे.
भारतीय लोकशाहीत वृत्तपत्र आणि पत्रकार चौथा स्तंभ मानला जातो. मात्र काही वर्षातील सरकारची धोरणे लक्षात घेता अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. ते प्रश्‍न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने राज्यव्यापी संवाद यात्रा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभर सर्वाधिक सदस्य संख्या असलेली एकमेव संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली यात्रा होणार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी, पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी हे ब्रीद घेवून संवाद यात्रा 24 जिल्ह्याच्या ठिकाणी आणि दिडशेपेक्षा अधिक तालुक्याच्या ठिकाणाहून जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी आणि थेट जनतेशी संवाद साधुन समर्थन मिळवण्यात येणार आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागपूरच्या दीक्षाभूमी येथून पत्रकार संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याला 28 जुलै रोजी प्रारंभ होत आहे. या यात्रेत हजारोंच्या संख्येने पत्रकार आणि नागरिक सहभागी व्हावे असे आवाहन सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांनी केले आहे.

असा असेल पत्रकार संवाद यात्रेचा मार्ग
नागपूरच्या दीक्षाभूमीत अभिवादन करून रविवार दि.28 जुलै रोजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संवाद यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर वर्धा, अमरावती, अकोला, शेगाव, मुक्ताईनगर, जळगाव, धुळे, नाशिक आणि पहिल्या टप्प्याचा समारोप शिर्डी येथे 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. दुसरा टप्पा छत्रपती संभाजीनगर येथून सुरू होईल आणि बीड, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, सातारा, बारामती, पुणे या मार्गे दि.20 ऑगस्ट रोजी मंत्रालय मुंबई येथे समारोप होणार आहे. या पत्रकार संवाद यात्रेत राज्यभरातील पत्रकार, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे जेष्ठ नेते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

पत्रकार हा समाजाचा महत्त्वाचा घटक-प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे
लोकशाहीत पत्रकार हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. राजकीय, प्रशासकीय व्यवस्थेवर अंकुश आणि जनजागृतीचे काम पत्रकारांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे समाजाचा आरसा म्हणून या क्षेत्राकडे पाहिले जाते. मात्र लोकांच्या सेवेसाठी समस्यांना वाचा फोडण्यासाठी चोवीस तास उपलब्ध असणार्‍या पत्रकारांनाही काही प्रश्‍न असतात याची जाणिव सरकारी व्यवस्थेला होत नाही. त्यामुळे संवाद यात्रेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्‍न मांडणार्‍या पत्रकारांच्या प्रश्‍नांची जाणिव या यात्रेतून होईल अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments