कोल्हापूर (प्रतिनिधी) : सतत पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापुरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण कोल्हापूर शहर तसेच जिल्ह्याला पुराचा विळखा बसला आहे. कोल्हापुरातील गंगा नदीची पाणी पातळी ४७ फुटांवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे राधानगरी धरणाच्या चार दरवाजांमधून अजूनही पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड आणि औरवाड गावाला पुराचा फटका बसला आहे. तसेच कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर चार फुटांपेक्षा जास्त पाणी पाहायला मिळत आहे.
पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे धरणांचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत. कोल्हापुरातील पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ फूट इतकी आहे. तर पंचगंगा नदीची धोका पातळी ही ४३ फूट इतकी आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ४७ फुटांवर म्हणजे धोका पातळीपेक्षा जास्त आहे. पंचगंगा नदी सध्या धोका पातळीपासून पाच फूट वरुन वाहत आहे. त्यामुळे कोल्हापुरात पूरपरिस्थिती पाहायला मिळत आहे.
कोल्हापुरातील राधानगरी धरणाच्या चार दरवाज्यातून सहा हजार क्युसेकचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सोडलं जात आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड आणि औरवाड गावात पूरस्थिती पाहायला मिळत आहे. या गावांना पुराने वेढा घातला आहे. तसेच सध्या कोल्हापुरातील प्रमुख राज्य मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यासोबतच काही जिल्हा मार्गही बंद करण्यात आले आहेत.
पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू
कोल्हापुरातील इचलकरंजी पुलावर पाणी आल्याने इचलकरंजी, कर्नाटककडे जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. तर चंदगडवरून इब्राहिमपूर, बुजवडे, माणगाव, भोगोली, पेळणी, नांदवडे पारगाव, कोदाळे,नागवेकडे रस्त्यावर पाणी आल्याने हे मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे
बंद असलेले प्रमुख राज्य मार्ग
कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर दोनवडे, मांडूकली येथे पाणी आल्याने बंद
कोल्हापूर राधानगरी रस्त्यावर हळदी येथे पाणी आल्याने बंद
कोल्हापूर रत्नागिरी रोडवर केर्ली, आंबेवाडी येथे पाणी आल्याने रस्ता बंद
निपाणी देवगड राज्य मार्गावर दिंडोरी येथे पाणी आल्याने रस्ता बंद
कोल्हापूर गारगोटी मार्गावर मडिलगे येथे पाणी आल्याने हा रस्ता बंद आहे
बंद करण्यात आलेले काही जिल्हा मार्ग
कोल्हापूर आरळे मार्गावर कोगे आणि महे ते पाणी आल्याने रस्ता बंद
कोल्हापूर ते बाजार भोगाव मार्गांवर पोहाळे येथे नदीचे पाणी आल्याने रस्ता बंद
इचलकरंजी कुरुंदवाड मार्गावर शिरढोण येथे पुराचे पाणी
हुपरी कागल मार्गावर इचलकरंजी पुलावर पाणी
इचलकरंजी कुरुंदवाड मार्गावर इचलकरंजी पुलावर पाणी
इचलकरंजी-कर्नाटक, खिद्रापूर मार्गांवर इचलकरंजी पुलावर पाणी आल्याने रस्ता बंद
गडहिंग्लज-कोवाड, बगडकुट्टी मार्गांवर ऐनापुर निलजी पुलावर पाणी आल्याने रस्ता बंद
गडहिंग्लज भडगाव मार्गावर भडगाव पुलावर पाणी आल्याने रस्ता बंद
चंदगड वरून इब्राहिमपूर, बुजवडे, माणगाव, भोगोली, पेळणी, नांदवडे पारगाव, कोदाळे,नागवे कडे रस्त्यावर पाणी आल्याने हे मार्ग बंद आहेत, काही ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे
कागल निढोरी मार्गावर मुरगुड निरवाडी पुलावर पाणी आल्याने हा रस्ता बंद
आजरावरून चंदगड, कोवाडे, साळगाव आणि देव कांडगाव कडे जाणाऱ्या रस्त्यांवर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे.