सातारा : शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन ४५०० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटना व किसान काँग्रेस विभागाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रत्यक्ष सहभागी झाले. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्याबाबत मुख्यमंत्री तसेच संबंधित केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण यांनी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांना सांगितले.
यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,

“शेतकऱ्यांच्या उसाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी केलेली ४५०० रुपये प्रति टन दराची मागणी ही त्यांच्या कष्टाचा आणि वाढलेल्या उत्पादन खर्चाचा विचार करता गांभीर्याने घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री तसेच केंद्र सरकारमधील संबंधित केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.”
उसाच्या उत्पादनासाठी लागणारा वाढता खर्च, मजुरी, खते, औषधे, सिंचन, तोडणी तसेच वाहतूक खर्च यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढत आहेत. त्यामुळे उसाला योग्य आणि परवडणारा दर मिळणे हा शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे. या पार्श्वभूमीवर ४५०० रुपये प्रति टन दराची मागणी करत शेतकरी संघटना आणि किसान काँग्रेस विभागाने हे चक्काजाम आंदोलन पुकारले.
आंदोलनादरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी आंदोलनस्थळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या विविध मागण्या आणि अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या आंदोलनामुळे नागठाणे येथील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी तैनात करण्यात आला होता.
या चक्काजाम आंदोलनात शेतकरी संघटनेचे राजू शेळके, किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष वसीम इनामदार, युवक काँग्रेसचे माण तालुका अध्यक्ष महेश करचे, विकास पाटील-शिरगांवकर यांच्यासह किसान काँग्रेसचे पदाधिकारी, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या उसाला ४५०० रुपये दर मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला.




