ताज्या बातम्या

माहीमच्या समुद्रकिनाऱ्यावरील प्रलंबित प्रश्नांवर धडक कारवाई; पाहणी करून समस्यांवर तात्काळ तोडगा

मुंबई (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर ) : माहीम येथील समुद्रकिनारी आणि जेट्टी परिसराची पाहणी करण्यासाठी मच्छीमार गेल्या एका वर्षापासून पाठपुरावा करत होते. या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, २ नोव्हेंबर २०२६ रोजी माहीम बे (Mahim Bay) जेट्टीवर माजी आमदार श्री. किरण पावसकर, एम.एस.आर.डी.सी. (MSRDC) चे अधिकारी, ‘आपको’ (Apco) कंपनीचे प्रतिनिधी आणि स्थानिक मच्छीमार सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी व बैठक पार पडली. या पाहणीदरम्यान स्थानिक मच्छीमारांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेऊन त्यावर घटनास्थळीच तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या.
या पाहणी दरम्यान ‘माहीम नाकवा मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित’, ‘महिकावती माहीम फिशरमेन्स सर्वोदय सहकारी सोसायटी’ तसेच ‘माहीम मच्छीमार विविध कार्यकारी सोसायटी मर्यादित’ या स्थानिक संस्थांचे सर्व प्रमुख पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर सचिन निफाडे आणि त्यांचे प्रशासकीय सहकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.
गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या या पाहणीदरम्यान समुद्रातील आणि जेट्टी परिसरातील मच्छीमारांना अडथळा ठरत असलेला ‘आपको’ कंपनीचा अवजड प्लांट/साहित्य प्रशासकीय तत्परतेने तात्काळ हटवण्यात आला. या धडक कारवाईमुळे स्थानिक मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रशासनाने दाखवलेल्या या सकारात्मक भूमिकेबद्दल आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर सचिन निफाडे व रोहन सोनार यांच्यासह आपको कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर आणि त्यांचे सहकारी, माही मच्छीमार सोसायटी तर्फे विनोद तांडले आणि संतोष निजाप आणि त्यांचे सहकारी, तसेच राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे पदाधिकारी सचिन लिमन व कार्तिक पवार उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच गंभीर प्रश्न तात्काळ मार्गी लावल्याबद्दल माजी आमदार किरण पावसकर यांनी प्रशासनाचे, अधिकाऱ्यांचे व सहकाऱ्यांचे आभार मानले.

Scroll to Top