ताज्या बातम्या

राज्यस्तरीय पोषण रसोई स्पर्धेत घाटकोपरच्या दीपाली तांबे, प्रतिभा भालेराव यांना प्रथम क्रमांक

मुंबई (शांताराम गुडेकर ) : ‘सर्वांसाठी अन्न आणि पोषण’ या संकल्पनेतून पोषण माह २०२६ निमित्त के कॉर्प चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय पोषण रसोई स्पर्धेत घाटकोपर येथील अंगणवाडी माता दीपाली संदीप तांबे आणि अंगणवाडी सेविका प्रतिभा राहुल भालेराव यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील पालघर, नंदुरबार, गडचिरोली, कर्जत आणि मुंबई या पाच प्रकल्प क्षेत्रांतील सुमारे ३५० सहभागी १७५ संघांच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या स्पर्धेचा मुख्य उद्देश अंगणवाडी केंद्रांमधून दिल्या जाणाऱ्या पूरक पोषण आहाराचा (टीएचआर) योग्य वापर करून स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासून कमी खर्चात पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ तयार करण्यास प्रोत्साहन देणे हा होता.घाटकोपरच्या दीपाली संदीप तांबे आणि प्रतिभा राहुल भालेराव यांनी टीएचआर खिचडी, टीएचआर पराठा, शेवग्याच्या पानांची चटणी, मिश्र भाज्यांचा चाट आणि टीएचआर लाडू यांचा समावेश असलेली पौष्टिक थाळी सादर केली. त्यांच्या अभिनव पाककृतीचे परीक्षकांनी कौतुक केले. या स्पर्धेत पालघरच्या यमुना सुरेश मिसाळ आणि प्रमिला सुभाष मिसाळ यांनी द्वितीय, तर गडचिरोलीच्या कविता रामू दुगा आणि पूजा रंजीत नारोटे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या आणि समुदायातील मातांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभागी महिलांनी टीएचआरचा वापर करून लाडू, पराठा, रवा वडी, लापशी, खिचडी, सुकडी आणि हलवा यांसारखे विविध पौष्टिक पदार्थ तयार केले.
पदार्थांचे पोषणमूल्य, स्वच्छता, खर्च, टीएचआरचा योग्य वापर, कुटुंबातील सदस्यांना पदार्थांची स्वीकारार्हता आणि सादरीकरण अशा विविध निकषांवर परीक्षण करण्यात आले.या स्पर्धेमुळे स्थानिक खाद्यपदार्थांचा वापर करून पूरक पोषण आहारातून विविध पौष्टिक पदार्थ तयार करण्याच्या क्षमतेला प्रोत्साहन मिळाले. तसेच अंगणवाडी सेविका आणि समुदायातील मातांचा पोषणविषयक उपक्रमांमधील सहभाग वाढविण्यास मदत झाली.
या उपक्रमातून निवडक पाककृतींचे संकलन करून टीएचआर पाककृती पुस्तिका तयार करण्यात येणार आहे. ही पुस्तिका अंगणवाडी केंद्रांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून, तिच्या माध्यमातून कुटुंबांना या पाककृती घरच्या घरी तयार करता येतील. मातांचे पोषण, पूरक पोषण आहाराचा नियमित वापर आणि स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देणे या उद्दिष्टांसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस) आणि आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रमुख पाहुणे आणि परीक्षक म्हणून सहभाग घेतला. गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, धानोरा येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी तसेच सायवन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती. या फेरीतील निवडक संघांना अंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळाली.
अंतिम फेरीच्या परीक्षक मंडळात ‘आयसीडीएस’ महाराष्ट्राच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, पोषणतज्ज्ञ व शैक्षणिक सल्लागार डॉ. अनुराधा मित्रा आणि ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेसचे कॉर्पोरेट शेफ राजेश शेट्टी यांचा समावेश होता.
या उपक्रमासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना, आरोग्य विभाग, कृषी विज्ञान केंद्रे, ग्रामपंचायती तसेच अरोहन, बायफ, बाल रक्षा भारत, सीएचआरआय, सीआरवाय, सीवायडीए आणि युनायटेड वे ऑफ मुंबई या संस्थांचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार व्यक्त केले आणि स्पर्धेचा समारोह केला.

Scroll to Top