ताज्या बातम्या

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील ऋषिकेश वीर यांची IPS पदाला गवसणी! सानपाड्याच्या ऋषिकेश वीर यांचे हैदराबाद येथे खडतर IPS प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण

नवी मुंबई : जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे मिलेनियम टॉवर, सानपाडा सेक्टर-८, नवी मुंबई येथील ऋषिकेश नागनाथ वीर यांनी सिद्ध करून दाखवले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राशी संबंधित कुटुंबातील ऋषिकेश यांनी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद येथील भारतीय पोलीस सेवेचे (IPS) खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या दिमाखदार दीक्षांत संचलन सोहळ्यात त्यांच्या यशावर शिक्कामोर्तब झाले.
केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रीय पोलीस अकादमीचे संचालक सुजित पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. यावेळी १५१ आयपीएस अधिकाऱ्यांनी दीक्षांत संचलनात सहभाग घेतला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदके देऊन सन्मानित करण्यात आले.
ऋषिकेश यांचे शालेय शिक्षण दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात, तर महाविद्यालयीन शिक्षण रुईया महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी गोवा येथील बिट्स पिलानीमधून बी.टेक. ही पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी सुरू केली. वडील नागनाथ वीर तसेच काका भरत वीर आणि चांगदेव वीर यांना स्पर्धा परीक्षांचा अनुभव असल्यामुळे घरातून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले. मात्र, कोणताही दबाव न आणता स्वतःच्या इच्छेने हे क्षेत्र निवडायचे असल्यास प्रचंड मेहनत करावी लागेल, हे कुटुंबीयांनी त्यांना स्पष्ट केले. ऋषिकेश यांनीही आत्मविश्वासाने हे आव्हान स्वीकारले.
तब्बल तीन ते चार वर्षे सातत्याने अभ्यास आणि कठोर परिश्रम केल्यानंतर UPSC परीक्षेत २०२४-२५ च्या निवड प्रक्रियेत त्यांनी देशभरात ५५६ वा क्रमांक मिळवला. त्यानंतर प्रशिक्षणातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जात त्यांनी आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
ऋषिकेश यांची कौटुंबिक पार्श्वभूमी मध्यमवर्गीय आहे. त्यांची आई सायन रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असून, वडील नागनाथ वीर बेस्टमध्ये मेकॅनिक पदावर कार्यरत आहेत. काका भरत वीर व चांगदेव वीर, बहीण शीतल वीर आणि भाऊ शुभम वीर हे उच्चशिक्षित असल्यामुळे घरात नेहमीच शिक्षण आणि अभ्यासाचे वातावरण राहिले. योग्य नियोजन, कुटुंबीयांचे मार्गदर्शन आणि ध्येयाचा सातत्याने पाठपुरावा यामुळे ऋषिकेश यांनी हे यश संपादन केले.
विशेष म्हणजे, याच वर्षी UPSCच्या वनसेवा परीक्षेतही ऋषिकेश यांची ८१व्या क्रमांकाने निवड झाली होती. मात्र, वनसेवेची संधी स्वीकारण्याऐवजी त्यांनी भारतीय पोलीस सेवेत प्रवेश करून देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयातून देशसेवेची जिद्द आणि आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छाशक्ती दिसून येते.
मध्यमवर्गीय कुटुंबातून सुरू झालेला प्रवास, स्पर्धा परीक्षेतील यश आणि त्यानंतरचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून ऋषिकेश वीर यांनी आपल्या स्वप्नाला वास्तवात उतरवले आहे. त्यांच्या या यशामुळे वीर कुटुंबीयांसह सानपाडा, नवी मुंबई परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ऋषिकेश वीर यांच्या पुढील सेवाकाळासाठी त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Scroll to Top