पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील महत्त्वाच्या स्वारगेट बस स्थानक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याचे चित्र आहे. रस्त्याचा पृष्ठभाग उखडला असून काही ठिकाणी फरशाही निखळल्याने प्रवाशांसह वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्वारगेट बस स्थानक परिसरात दररोज मोठ्या संख्येने एसटी बस, पीएमपीएमएल बस, दुचाकी, चारचाकी तसेच पादचाऱ्यांची वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना अचानक खड्डा आल्यास वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
एकीकडे पुणे शहराच्या विकासाच्या विविध योजना आणि मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना, दुसरीकडे शहरातील प्रमुख बस स्थानक परिसरातील रस्त्यांची अशी अवस्था झाल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
खड्डे बुजवणार तरी कधी?
स्वारगेट बस स्थानक परिसरातील रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत, उखडलेल्या भागाची दुरुस्ती करून आवश्यक ठिकाणी डांबरीकरण करावे, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून होत आहे.
‘फोटोच सांगतोय रस्त्याची अवस्था’; आता तरी प्रशासनाने जागे होऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.




