ताज्या बातम्या

धारावीकरांना भविष्यातील घर, परिसर व रोजगाराच्या संधींचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनातील प्रश्न, संभ्रम आणि गैरसमज दूर करण्यासाठी ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून धारावीकरांना पुनर्विकासानंतर मिळणारे घर, परिसर, रस्ते, खुली मैदाने, सामाजिक सुविधा तसेच रोजगाराच्या संधी यांचे प्रत्यक्ष आणि डिजिटल स्वरूपात दर्शन घडणार आहे. त्यामुळे अफवा व अपूर्ण माहितीला आळा बसून पुनर्विकासाबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पीएमजीपी कॉलनी, एच ब्लॉक, बीकेसीजवळ उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी केंद्राची पाहणी करून विविध विभागांची माहिती घेतली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धारावी ही केवळ झोपडपट्टी नसून मुंबईच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. कुंभारवाड्यातील मातीभांडी उद्योग, चामड्याचा व्यवसाय, अन्नप्रक्रिया, प्लास्टिक पुनर्चक्रीकरण तसेच विविध लघु-मध्यम उद्योगांमधून येथे मोठी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. धारावीची सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक ओळख जपत या उद्योगांना अधिक चांगल्या व नियोजित कार्यस्थळांची सुविधा देण्याचा प्रयत्न पुनर्विकास आराखड्यात करण्यात आला आहे.
‘आजची धारावी आणि उद्याची धारावी’ यामधील बदल नागरिकांना समजावून सांगण्याचे काम हे केंद्र करणार आहे. पुनर्विकासानंतर आपले काय होणार, हा धारावीकरांच्या मनातील प्रश्न दूर करण्यासाठी केंद्रात रिअल टाइम माहिती, डिजिटल सादरीकरण आणि आधुनिक दृश्य-श्राव्य तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
या केंद्रात धारावीच्या वर्तमानापासून भविष्यातील नियोजित स्वरूपापर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला आहे. रहिवाशांची घरे, रस्ते, खुल्या जागा, सामाजिक पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधी यांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांसह नागरी नियोजनाचा अभ्यास करणाऱ्या विविध घटकांसाठीही हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, धारावी पुनर्विकास प्रकल्प व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सचिव विपीन पालिवाल, अदाणी नवभारत डेव्हलपर्स प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सरदाना, अदाणी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अदानी आदी उपस्थित होते.
दरम्यान, प्रख्यात गायक शंकर महादेवन यांनी गायिलेल्या बदलत्या धारावीचे चित्र मांडणाऱ्या ‘धारावी का कल’ या विशेष गीताचे लाँचिंग तसेच ‘मेरे सपनों की धारावी’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

Scroll to Top