ताज्या बातम्या

‘स्पंदन’ कडून विचारांची देवाणघेवाण आणि सेवाभावी कार्याचा सन्मान- महंत आहिल्यागिरीजी महाराज

तळमावले/वार्ताहर : एखाद्या व्यक्तीचे खरे मोठेपण त्याच्या मृत्यूनंतरही लोक किती आठवतात आणि त्याच्या कार्याचा वारसा कसा पुढे चालवतात, यातच असते, स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांनी समाजात जे मोलाचे कार्य केले, ते आपल्या सर्वांसाठी कायम प्रेरणादायी असल्याचे मत महंत अहिल्यागिरीजी महाराज (शिवदत्त मठ, कापसेवाडी) यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर संभाजीराव पाटणकर (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी), प्रदीप कांबळे (वक्ते/लेखक/कवी), डॉ.राजेंद्र कंटक (गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर), विशाल पाटील (सातारा जिल्हा प्रतिनिधी, न्यूज 18 मराठी), अमित देशमुख (उपविभागीय डाक अधिकारी, कराड पूर्व उपविभाग), गयाबाई डाकवे, डाॅ.संदीप डाकवे आदी मान्यवर उपस्थित होते
साहित्य आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववानांचा गौरव करण्यासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रुस्ट, महाराष्ट्र राज्य, डाकवे परिवार आणि स्पंदन एक्सप्रेसच्या सहकार्याने स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महंत अहिल्यागिरीजी महाराज पुढे बोलताना म्हणाल्या की, माणूस जन्माला येतो आणि एक दिवस निघून जातो, परंतु ज्याने जन्माला येऊन समाजासाठी काहीतरी चांगले कार्य केले, त्याचे नाव कायमस्वरूपी अजरामर राहते. संत महात्मे आणि समाजसुधारकांनी आपल्याला नेहमीच परोपकाराचा आणि कष्टाचा मार्ग दाखवला असून त्यांची शिकवण हीच आपली खरी ताकद आहे.
आजचा हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा नसून विचारांची देवाणघेवाण करण्याचा आणि चांगल्या कामांना प्रोत्साहन देण्याचा एक उत्तम मंच आहे, असे त्यांनी नमूद करत समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन सामाजिक कार्यात हातभार लावला पाहिजे आणि एकमेकांना मदत करत पुढे गेले पाहिजे, असा संदेश दिला.
यावर्षीचा प्रथम वर्षाचा स्व.राजाराम डाकवे (तात्या) सामाजिक कृतज्ञता पुरस्कार शिवसमर्थ समूहाचे कुटुंबप्रमुख ॲड.जनार्दन बोत्रे यांना देण्यात आला, पुरस्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, सदर पुरस्कार दिल्याबद्दल मी डाकवे परिवाराचे आभार व्यक्त करतो. डाकवे परिवाराच्या वतीने सुरू असलेल्या या सामाजिक व साहित्यिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. आजच्या तरुणांनी केवळ स्क्रीनवर वेळ न घालवता पुस्तकांशी नाते जोडावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
संभाजीराव पाटणकर या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, माणूस जग सोडून गेला तरी त्याचे विचार आणि कार्य जिवंत राहतात. तात्यांच्या स्मृती जपण्याचा हा कार्यक्रम म्हणजे केवळ एका व्यक्तीचे नव्हे तर त्यांच्या विचारांचे स्मरण आहे. डिजिटल युगात पुस्तकांचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, आज मोबाईलच्या जगात पुस्तक वाचनाची सवय जपणे अत्यंत गरजेचे आहे. मोबाईल ज्ञान देईल, पण विचार करण्याची शक्ती आणि योग्य दिशा पुस्तकांकडूनच मिळते. ग्रामीण भागातील वाचनालये ही संस्कृती जपण्याचे काम करतात, असे सांगून त्यांनी वाचन संस्कृती वाढवण्याचे आवाहन केले.
डाॅ.शिवाजी शिंदे यांनी आपल्या मनोगतातून कवितेच्या ओळी सादर करत आजच्या समाजातील घटत चाललेली माणुसकी आणि वाढत्या स्वार्थावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, आज समाजात स्वार्थ आणि कपट वाढले आहे. अशा वातावरणात माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे आणि मानवी संवेदनांचा धागा घट्ट पकडून ठेवणे हीच आपली खरी प्रार्थना असली पाहिजे. आपल्या भावूक भाषणात त्यांनी आई-वडिलांचे स्थान, त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंचे मोल आणि कौटुंबिक मूल्यांचे महत्त्व यावरही विशेष भर दिला.
डाॅ.राजेंद्र कंटक यांनी उपस्थितांना संबोधित करताना अत्यंत भावूक आणि प्रभावी विचार मांडले. बोलताना ते म्हणाले की, इतक्या दुरून आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांतील अश्रू आणि भावना लक्षात घेऊन समाजात चांगल्या विचारांची पेरणी केली पाहिजे. उपदेशात्मक प्रसंगांतून संस्कार, आदरातिथ्य आणि चांगल्या संगतीचे महत्त्व पटवून दिले. मानवी आयुष्यात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी चांगले संस्कार अन् योग्य सोबत किती महत्त्वाची असते, यावर त्यांनी आपल्या भाषणात विशेष भर दिला.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या विविध सामाजिक कार्याचे आणि उपक्रमाचे विशेष कौतुक करत आज कार्यक्रमाला पुण्यवान लोकं भेटलीत, त्यांना भेटण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार आणि तुमच्या या पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो, असे विशाल पाटील यांनी आपल्या मनोगतात म्हटले.
सुप्रसिध्द व्याख्याते प्रदीप कांबळे अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, या सुंदर आणि प्रेरणादायी कार्यक्रमाच्या माध्यमातून आज अनेक कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव होत आहे. जगणे सुंदर आहे, मरणे सुंदर आहे, परंतु त्याहूनही अधिक सुंदर माणसाला जगवणे आणि संकटात आधार देणे हे आहे. माणसाच्या पाठीशी उभे राहणे, त्याला संकटातून बाहेर काढणे हीच खरी मानवता आहे.
आज आपण पाहतो की,या कार्यक्रमासाठी अनेक लोक दूरवरून, अगदी लांबवरून प्रवास करून उपस्थित राहिले आहेत. हे सर्वजण इथे येण्यामागे त्यांचा एकच उद्देश आहे. तो म्हणजे एकमेकांप्रती असलेला स्नेह आणि आपलेपणा..! या कार्यक्रमाच्या माध्यमातून माणसा-माणसांमधील जिव्हाळा आणि प्रेम वृद्धिंगत होत आहे, जे आजच्या समाजात अत्यंत गरजेचे आहे. कार्यक्रमातून समाजाला एक सकारात्मक दिशा मिळाली पाहिजे. आपण सर्वजण मिळून हाच विचार पुढे नेऊया, एकमेकांना मदत करूया आणि समाजात प्रेमाची व आपुलकीची गुढी उभारूया..!
डाकवे कुटुंबाच्या आणि स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या बाबतीत सांगायचे तर, तात्या हे डाकवे कुटुंबासाठी आणि आपल्या सर्वांसाठी श्रम आणि संस्कारांचे विद्यापीठ होते. तात्यांचा सर्वात मोठा विश्वास हा श्रमावर आणि संस्कारांवर होता. आपण सर्वांनी प्रामाणिक श्रम करत आणि चांगल्या संस्कारांची जपणूक करतच पुढे गेले पाहिजे, असे मत प्रा.ए.बी.कणसे यांनी प्रास्ताविकपर भाषणात व्यक्त केले. आणि त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
याप्रसंगी राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक, स्व.राजाराम डाकवे तात्या स्मृती सर्वोत्कृष्ट वाचनालय पुरस्कार, तात्याश्री दिवाळी अंक स्पर्धेतील विजेते, सेल्फी विथ गुढी स्पर्धेतील विजेते यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात करताना स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या प्रतिमेचे पूजन करुन आणि दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ए.बी.कणसे, आभारप्रदर्शन प्रा.दादाराम साळुंखे यांनी तर सुत्रसंचालन माधुरी सावंत-भोसले यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरत डाकवे, प्रथमेश डाकवे, पौर्णिमा डाकवे, जीवन काटेकर, विकास साळुंखे, आशा मुटल, सुनील मुटल, रत्नाबाई काळे, भिमराव धुळप, डाकवे व समस्त डाकवे परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top