ताज्या बातम्या

भविष्यवेधी तंत्रज्ञानाला मानवी चेहरा असावा; तंत्रज्ञानाचा लाभ अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आदी भविष्यवेधी तंत्रज्ञानाला मानवी चेहरा असावा व तंत्रज्ञानाचा लाभ समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे कुलगुरूंशी बोलताना व्यक्त केली.

राज्यपाल देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरुंची ‘भविष्यवेधी तंत्रज्ञान’ गटाची (Futuristic Technology Forum) बैठक आज लोकभवन मुंबई येथे संपन्न झाली, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

बैठकीला भविष्यवेधी तंत्रज्ञान गटाचे प्रमुख शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ राजनीश कामत, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुनील भिरूड व डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रा. अरविंद किवळेकर तसेच इतर अध्यापक उपस्थित होते.

विकसित भारत संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी भविष्यवेधी तंत्रज्ञान हा महत्वाचा विषय असून तो राज्यातील सर्व विद्यापीठांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यापीठांमध्ये परस्पर सहकार्य आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले. भविष्यवेधी तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण, आरोग्य, रोजगार सर्वसमावेशक व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

उच्च शिक्षणात एआय तंत्रज्ञानामुळे शिक्षण संवादी स्वरूपाचे होईल. लोकसंख्येच्या तुलनेत देशातील डॉक्टरांची कमतरता लक्षात घेता आरोग्य क्षेत्रात एआयमुळे अचूक रोगनिदान करणे शक्य होईल व त्याचा लाभ शहरी तसेच ग्रामीण भागातील जनतेला होईल असे राज्यपालांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे विस्मृतीसारख्या आजाराची पूर्वसूचना मिळू शकेल तसेच ड्रग संशोधनात देखील मदत होईल असे राज्यपालांनी सांगितले.

लॉजिस्टिकस क्षेत्र आज फार मोठे वाढले असून या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे समुद्रमार्गे होणाऱ्या माल वाहतुकीवर प्रत्येक पातळीवर लक्ष ठेवता येईल व माल गंतव्य ठिकाणी पोहोचण्याचा वेळ निर्धारित करता येईल असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी भविष्यवेधी तंत्रज्ञान गटाचे प्रमुख डॉ राजनीश कामत यांनी गटाच्या शिफारसी राज्यातील विद्यापीठांना २०३० पर्यंत विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानासाठी तयार करेल असे सांगितले. तंत्रज्ञानाचा उपयोग जबाबदारीने करण्याबाबत देखील मार्गदर्शन होईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी सीओईपी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुनील भिरूड यांनी ‘आरोग्य क्षेत्रात एआय’ या विषयावर तर ‘बाटु’ येथील प्रा. अरविंद किवळेकर यांनी लॉजिस्टिकस विषयातील एआय या विषयावर सादरीकरण केले.

राज्यपालांच्या हस्ते डेटा सायन्सवरील पुस्तकाचे प्रकाशन

यावेळी राज्यपालांच्या हस्ते झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग येथील प्रा जॉन रोज यांनी टोकियो येथील सोफिया विद्यापीठातील संशोधकांच्या सहकार्याने लिहिलेल्या ‘जॉय ऑफ पायथॉन: फाउंडेशन्स ऑफ डेटा सायन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी पुस्तकाचे सहलेखक जॉन मुकुलु व टॅड गोन्साल्विस हे देखील उपस्थित होते.

Scroll to Top