सातारा – ग्रामीण भागातील गोरगरीब आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा १०७ वा वर्धापन दिन सोहळा रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता साताऱ्यातील कर्मवीर समाधी परिसरात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा गौरव करताना गुणवंत शिक्षक, विद्यार्थी, विविध विभागांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे सचिव किशोर राजेनिंबाळकर यांनी सांगितले.
संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत , प्रख्यात वक्ते संजय आवटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक कार्यासाठी तन-मन-धन अर्पण करणाऱ्या महान व्यक्तींच्या स्मृती जपण्यासाठी संस्थेच्या वतीने त्यांच्या नावाने विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. आदर्श विभाग, आदर्श लाइफ मेंबर, आदर्श लाइफ वर्कर, आदर्श प्राचार्य, आदर्श स्वायत्त महाविद्यालय, आदर्श विद्यार्थिनी, आदर्श गुरुकुल, आदर्श विज्ञान शिक्षक, कार्यक्षम गुरुकुल प्रमुख, उपक्रमशील शाळा अशा विविध पुरस्कारांनी गुणवंतांचा गौरव केला जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात सुवर्णपदकांसह उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा वसा जपणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या या वर्धापन दिन सोहळ्यास शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव किशोर राजेनिंबाळकर यांनी केले आहे.




