मुंबई : राज्यात शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाली असून नवरात्रोत्सव व दिवाळीचे सण तोंडावर आले आहेत. अशा परिस्थितीत अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कोणतीही पूर्वसूचना अथवा अधिकृत पत्रक न काढता वेतनाचा टॅब थांबविणे योग्य नसल्याचे सांगत शिक्षक भारती संघटनेने याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
या मागणीसाठी माजी शिक्षक आमदार कपिल पाटील आणि कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली. संचमान्यतेचे निकष बदलल्यामुळे अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरविले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे नवीन वेतन टॅब सुरू होईपर्यंत अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावे, अशी मागणी करण्यात आली.
माहे सप्टेंबरचे, ऑक्टोबरमध्ये अदा होणारे वेतनपत्रक स्वीकारले जात नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना या महिन्याचे वेतन मिळण्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. वेळेवर वेतन न मिळाल्यास गृहकर्जाचे हप्ते, घरखर्च तसेच दैनंदिन आर्थिक गरजा भागविताना कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
नवरात्र व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी होऊ नये, यासाठी शिक्षणमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी शिक्षक भारतीने केली आहे.




