ताज्या बातम्या

प्रशांत शर्मा यांचा अभिष्टचिंतन सोहळा वारकरी कीर्तनातून उत्साहात साजरा

मुंबई : पवई येथील नामांकित उद्योजक व समाजसेवक माननीय श्री. प्रशांत जी. शर्मा यांचा अभिष्टचिंतन सोहळा वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यास असंख्य वारकरी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांनी कीर्तनसेवा सादर केली. संत नामदेव महाराजांच्या “अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा” या अभंगातून त्यांनी प्रशांत शर्मा यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कीर्तनाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक गायनगंधर्व प्रकाशजी कातकडे आणि गायनगंधर्व कुंदनजी बोरसे यांनी गायनाची साथ दिली. पखवाजाची साथ नाशिक भूषण विकासजी बेलूकर यांनी केली. तसेच अभंगगायक सुभाष उबाळे आणि तबला विशारद सूर्यांश शर्मा यांनीही संगीताची सुरेल साथ दिली.
या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन दूर्वाप्रिय माऊली प्रतिष्ठान, पवई यांच्या वतीने करण्यात आले होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून प्रशांत शर्मा यांना शुभेच्छा दिल्या. श्री संत मोरे माऊली स्वरसाधना हरिपाठ मंडळाच्या वतीने प्रशांत शर्मा यांना श्री विठ्ठल-रुक्माईची विशेष मूर्ती भेट देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.
भक्तिमय वातावरणात, वारकरी परंपरेनुसार झालेला हा अभिष्टचिंतन सोहळा उपस्थितांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

Scroll to Top