मुंबई, दि. १० : भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा जागर आता प्रथमच परदेशातील लंडनच्या संसदेत करण्यात येणार आहे. भारतासह जपान, कंबोडिया, थायलंड, श्रीलंका, फ्रान्स, दक्षिण कोरिया आणि यूके येथील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा विशेष आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
बोधिसत्व फाउंडेशन, मुंबई, भारत आणि बीबीएमजी फाउंडेशन, लंडन, यूके यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती कार्यक्रमाचे आयोजक व बोधिसत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कांबळे तसेच बीबीएमजी फाउंडेशन, लंडनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गौरव हंस यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. मित्तल देडिया आदी उपस्थित होते.
भारताचे संविधान आणि संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याला समर्पित या उपक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित बायोपिक तसेच विशेष नाट्यमय (थिएट्रिकल) सादरीकरण करण्यात येणार आहे. लंडन आणि लीसेस्टर येथेही या कार्यक्रमांतर्गत विशेष सादरीकरणांचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, सामाजिक चळवळी, संघर्ष, विचार, साहित्यिक व बौद्धिक वारसा तसेच सामाजिक समतेची त्यांची दूरदृष्टी यांचा जागतिक पातळीवर परिचय करून देणे हा या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे.
‘इंडो-यूके फ्री ट्रेड समिट – Chapter 10’
या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून लंडनच्या संसदेत ‘इंडो-यूके फ्री ट्रेड समिट – Chapter 10’ चे आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि यूके यांच्यातील द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक, उद्योग आणि व्यावसायिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने भारत व यूकेमधील प्रमुख उद्योगपती, उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या परिषदेत सहभागी होणार आहेत.
सामाजिक समानता, सांस्कृतिक देवाणघेवाण, आर्थिक सहकार्य आणि भारत-यूके संबंध अधिक बळकट करणे, ही या आंतरराष्ट्रीय उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
भारतासह विविध देशांतील मान्यवरांना निमंत्रण
या कार्यक्रमासाठी भारतातून केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, तसेच महाराष्ट्राचे मंत्री संजय शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे.
यूकेमधून माजी पंतप्रधान ऋषी सुनक, खासदार वीरेंद्र शर्मा, खासदार रामी रेंजर, माजी महापौर सुनील चोप्रा, होली ग्रुपचे चेअरमन विजय गांधी, खासदार बॉब ब्लॅकमॅन, खासदार गॅरेथ थॉमस तसेच विविध क्षेत्रांतील उद्योगपती आणि मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
थायलंडमधून माजी पंतप्रधान प्रवित वोन्सुवोन तसेच सुरक्षा मंत्री आडूल बून्थम्चरोएन, तर श्रीलंकेतून माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.
भारतीय संविधानाच्या ७५ वर्षांच्या वाटचालीचा गौरव करण्याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय ही मूल्ये जागतिक पातळीवर पोहोचविण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे आयोजक डॉ. गौरव हंस आणि अविनाश कांबळे यांनी सांगितले.




