ताज्या बातम्या

अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहा महिन्यांच्या थकीत वेतनासाठी शिक्षक भारतीचे आंदोलन

मुंबई : मुंबई शहर व उपनगरातील विशेष शाळांमधील अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहा महिन्यांपासून रोखून ठेवलेले वेतन तातडीने अदा करावे, या मागणीसाठी चेंबूर येथील समाजकल्याण कार्यालयासमोर शिक्षक भारती विशेष शाळा युनिटच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, मुंबई शहर व उपनगर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अनुपस्थित असल्याने शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत निषेध नोंदविला. यावेळी समाजकल्याण विभागाच्या अधीक्षक श्रीमती रूपाली पाटील यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा झाली. काही कर्मचाऱ्यांचे वेतन एक दिवसापूर्वीच जमा करण्यात आले असून, उर्वरित कर्मचाऱ्यांचे तांत्रिक अडथळे दूर करून आठ दिवसांत थकीत वेतन अदा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

विशेष शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने पटसंख्येचे निकष लागू करून अतिरिक्त ठरविण्यात आल्याचा आरोप शिक्षक भारतीने केला आहे. या प्रक्रियेबाबत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे हरकत नोंदवून चौकशीची मागणी केली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणाची चौकशी झालेली नसल्याचे संघटनेने म्हटले आहे.

शासनाचे कोणतेही स्पष्ट आदेश नसताना संबंधित कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून वेतन रोखण्यात आल्याने त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. वेतनाअभावी गृहकर्जाचे हप्ते थकले असून, दैनंदिन खर्च भागविण्यासाठी उसनवारी करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. अनेकदा पत्रव्यवहार करूनही दखल न घेतल्याने अखेर कर्मचाऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले.

आंदोलनाची नोटीस दिल्यानंतर काही कर्मचाऱ्यांचे वेतन जमा करण्यात आले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांचे वेतन तांत्रिक अडचणी दूर करून आठ दिवसांत देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. चर्चेत ठरल्याप्रमाणे थकीत वेतन आठ दिवसांत मिळाले नाही, तर मंत्री ना. अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिला.

या आंदोलनात मुंबई शिक्षक भारतीच्या अध्यक्षा कल्पना शेंडे, उपाध्यक्ष अशोक शिंदे, मुंबई पदाधिकारी भाऊसाहेब पानमंद, बाळासाहेब चव्हाण यांच्यासह विशेष शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top