मुंबई : चिपळूण येथील AHA हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या कारभाराबाबत विद्यार्थ्यांची कथित फसवणूक, अनियमितता, मान्यता तसेच प्रशासकीय गैरकारभाराच्या तक्रारी समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदार रोहित बी. आदमाने यांनी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.त्याबद्दल त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
तक्रारीनुसार, महाविद्यालयाची मान्यता व विद्यापीठाशी असलेली संलग्नता, वापरण्यात येणारी कागदपत्रे तसेच शैक्षणिक सुविधांची अधिकृत यंत्रणेमार्फत पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच महाविद्यालयाच्या सोशल मीडिया जाहिरातींमध्ये करण्यात येणारे दावे प्रत्यक्ष सुविधांशी सुसंगत आहेत का, याचीही चौकशी करण्याची मागणी आहे.
विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या वसतिगृहाची स्थिती, सुरक्षा, स्वच्छता, आहाराचा दर्जा आणि अग्निसुरक्षा नियमांचे पालन यांची प्रत्यक्ष पाहणी करावी, असे निवेदनात नमूद आहे. चौकशीत गैरप्रकार किंवा अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदाराने निवेदनासोबत कागदपत्रे, छायाचित्रे, ऑडिओ रेकॉर्डिंग व विद्यार्थ्यांच्या तक्रारी पुराव्यादाखल जोडल्याचा दावा केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तातडीने वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.




