ताज्या बातम्या

LDC भरतीला ‘स्किल टेस्ट’च्या रद्दीकरणाने नवा धक्का ! कथित पेपरफुटीच्या चर्चेनंतर १२ सप्टेंबरपासूनची कौशल्य चाचणी रद्द…

मुंबई(साबीर शेख) : टाटा मेमोरियल सेंटरच्या २६ जुलै २०२६ रोजी झालेल्या LDC अर्थात लोअर डिव्हिजन क्लर्क पदाच्या लेखी परीक्षेबाबत कथित पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील संभाव्य अनियमिततेच्या चर्चेला आता गंभीर वळण मिळाले असल्याची चर्चा जोर धरत आहे. लेखी परीक्षेनंतर उमेदवारांना देण्यात येणारी कौशल्य चाचणी म्हणजेच ‘स्किल टेस्ट’ १२ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचे ई-मेलद्वारे कळविण्यात आल्याचे समजते. मात्र, हीच कौशल्य चाचणी काही परीक्षार्थी उमेदवारांची रद्द करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समोर आल्याने भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्किल टेस्ट रद्द करण्याचा निर्णय नेमका का घेण्यात आला? हा निर्णय कथित पेपरफुटीच्या चर्चेशी संबंधित आहे का? आणि लेखी परीक्षेच्या निष्पक्षतेबाबत निर्माण झालेल्या शंकांचे निरसन कसे होणार? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे आता TMC प्रशासनाकडून अपेक्षित आहेत.

प्रश्नपत्रिकेपासून स्किल टेस्टपर्यंत; प्रत्येक टप्प्याची चौकशी झाल्यास…
कथित पेपरफुटीची चर्चा केवळ आरोप-प्रत्यारोपांपुरती मर्यादित न ठेवता प्रश्नपत्रिकेची निर्मिती, छपाई, सुरक्षित साठवणूक, वाहतूक, परीक्षा केंद्रांवर वितरण आणि परीक्षा व्यवस्थापनापर्यंतचा संपूर्ण प्रवास तपासण्याची मागणी काही शिष्टमंडळा कडून होत असल्याचे समजते.

प्रश्नपत्रिकांच्या प्रती किती होत्या? त्या कुठे ठेवण्यात आल्या? कोणाला प्रवेश होता? छपाईदरम्यान कोणत्या सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या? प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांपर्यंत कशा पोहोचविण्यात आल्या? वितरणाची नोंद कोणी केली? या सर्व प्रश्नांची कागदोपत्री उत्तरे तपासणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

यासोबतच सर्व्हर लॉग, ऑनलाइन लॉगिन रेकॉर्ड, डिजिटल नोंदी, प्रिंटिंग रेकॉर्ड, वितरण नोंदी, प्रवेश नियंत्रण प्रणाली, CCTV फुटेज आणि उपलब्ध अन्य इलेक्ट्रॉनिक पुरावे तातडीने सुरक्षित करून त्यांची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी होत आहे.

या प्रकरणात कोणत्याही व्यक्तीला केवळ आरोपांच्या आधारे दोषी ठरविणे योग्य नाही. मात्र, तितकेच महत्त्वाचे म्हणजे गंभीर स्वरूपाच्या शंका निर्माण झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करणेही योग्य ठरणार नाही. त्यामुळे स्वतंत्र समिती किंवा निष्पक्ष चौकशी यंत्रणेमार्फत तपास करून अनियमितता झाली का, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता भंगली का, आणि त्याचा उमेदवारांच्या निकालावर किंवा निवड प्रक्रियेवर परिणाम झाला का, हे स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.

यापूर्वीच्या TMC येथील LDC भरती प्रक्रियेबाबतही तक्रारी आणि संशय व्यक्त झाल्याचा दावा केला जात होता त्यात संबंधित अधिकाऱ्यांच्या ओळखीतील व्यक्तीच्या मुलाच्या निवडीबाबत संशय निर्माण झाल्यानंतर निवड रद्द करून भरती प्रक्रिया पुन्हा राबविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून केली जात आहे.

मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे त्या प्रकरणातील अधिकृत निर्णय, चौकशी अहवाल आणि कागदोपत्री नोंदी प्रशासनाने सार्वजनिक कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, TMC च्या वरिष्ठ प्रशासकीय पदांवरील व्यक्तींच्या कुटुंबीयांपैकी कोणी संस्थेत कर्मचारी आहे का..? आणि भरती प्रक्रियेत कोणताही संभाव्य हितसंबंध त्यामुळे निर्माण झाला होता का, याबाबतही चर्चा जोर धरत आहे. मात्र, अशा दाव्यांची अधिकृत पुष्टी करण्यासाठी संबंधित परीक्षा प्रक्रियेतील बाबींची स्वतंत्र कागदोपत्री पडताळणी होणे आवश्यक आहे. व तपासा अंती संगनमत प्रश्नपत्रिका फुटल्याचे किंवा परीक्षा प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींविरुद्ध लागू कायद्यांनुसार फौजदारी गुन्हा दाखल करून, सेवा नियमांनुसार निलंबनासह कठोर कारवाई करण्यात यावी अशी खंत काही प्रशिक्षार्थी व्यक्त करत आहे.

प्रशिक्षर्थी निर्दोष उमेदवारांवर अन्याय होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रक्रिया पुराव्यावर आधारित आणि पारदर्शक पद्धतीने तपासण्याची मागणी समोर येत असून LDC ची स्किल टेस्ट का रद्द झाली? लेखी परीक्षेबाबतच्या शंकांचे काय? आणि हजारो उमेदवारांच्या भवितव्याची जबाबदारी कोणाची?या सर्व गंभीर प्रश्नांची उत्तरे आता केवळ चर्चेतून नव्हे, तर अधिकृत कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि स्वतंत्र चौकशीच्या निष्कर्षातून समोर येणे आवश्यक असल्याची अपेक्षा या निमित्ताने TMC संस्थानाच्याबाबत वरिष्ठ पातळीवर होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Scroll to Top