कराड : कराड तालुक्यातील म्हासोली परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली असून, बिबट्याने शेतातील गोठ्यात शिरून दोन शेळ्यांचा फडशा पाडून एका शेळीला जखमी केले . या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जळका माळ नावाच्या शिवारात श्रीकांत चंद्रू शेटे या शेतकऱ्याच्या शेतातील शेळ्यांच्या शेडमध्ये बिबट्याने प्रवेश केला. शेतामध्ये पत्र्याचे शेड असून, शेळ्यांच्या सुरक्षिततेसाठी शेडच्या बाजूला तारेची जाळी व इतर व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, बिबट्याने त्यातून मार्ग काढत शेडमध्ये प्रवेश केला.
बिबट्याने शेडमध्ये बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला करून दोन शेळ्यांचा फडशा पाडला.तर एका शाळेला जखमी केले, या हल्ल्यात शेतकऱ्याचे अंदाजे ३० ते ३५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सकाळी शेळ्या मृतावस्थेत आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली. सदर घटनेचा पंचनामा वन विभागाच्या वतीने करण्यात आला आहे
दरम्यान, परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी शेताकडे जाण्यासाठी भीती वाटत असून, वनविभागाने या परिसरात तातडीने पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
बिबट्याच्या हल्ल्यामुळे पशुधनाचे नुकसान होण्याच्या घटना वाढत असल्याने शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. वनविभागाने बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन परिसरातील नागरिकांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




