मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभागातील घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या माध्यमातून गेल्या १२ वर्षांपासून सुका कचरा वर्गीकरण आणि स्वच्छतेबाबत जनजागृतीचे सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या ‘संगम प्रतिष्ठान’ या संस्थेच्या कार्याचा डंका आता म्हैसूरमध्येही गाजत आहे. म्हैसूर येथील चामुंडेश्वरी मंदिर परिसर तसेच आहार मेळा परिसरात नवरात्रोत्सवादरम्यान लाखो भाविकांच्या उपस्थितीत स्वच्छता सेवा, जनजागृती आणि ‘पेट कलेक्शन ड्राइव्ह’ राबविण्यासाठी संस्थेची यंदाही नियुक्ती करण्यात आली होती.
नवरात्रोत्सवाच्या काळात सलग १२ दिवस संगम प्रतिष्ठानच्या ६० कचरावेचक स्वयंसेवकांनी आणि पथनाट्याच्या चमूने प्रभावीपणे स्वच्छता सेवा बजावली. कचऱ्याचे वर्गीकरण, परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धन याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. संस्थेच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत म्हैसूर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती एम. के. सविता यांच्यासह संपूर्ण प्रशासनाने संस्थेचे कौतुक केले.
या उपक्रमाच्या निमित्ताने कोकाकोलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्यासह कंपनीच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगम प्रतिष्ठानच्या सचिव ॲड. कोमल तानाजी घाग आणि संस्थेचे संचालक श्री. रंगनाथ नाडर यांचे अभिनंदन केले. मुंबई महानगरपालिकेच्या धारावी येथील ड्राय वेस्ट सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी करण्यासाठी वेळ काढून येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
मुंबईत गेल्या १२ वर्षांपासून स्वच्छता, सुका कचरा वर्गीकरण आणि पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी कार्यरत असलेल्या संगम प्रतिष्ठानच्या कामाची म्हैसूरमध्ये झालेली प्रशंसा ही संस्थेसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. स्थानिक पातळीवरील स्वच्छता उपक्रमांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने हा गौरव महत्त्वपूर्ण ठरत आहे.




