ताज्या बातम्या

येळगाव-गोटेवाडी जलसंधारण तलावातील मोटारी बंद;पाणीसाठा मर्यादित; पुढील सहा ते सात महिने पाणी जपून वापरण्याचे आव्हान

येळगाव-गोटेवाडी : येथील जलसंधारण तलावातील पाण्याचा उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारी महावितरण कंपनीने बंद केल्याची माहिती आहे. मात्र, या मोटारी अद्याप तलावातील पाण्यातच असल्याने सायफन (सायपन) पद्धतीने पाणी सुरू असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जलसंधारण विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

सध्या तलावातील पाणीसाठा मर्यादित असून, येत्या काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अद्याप सहा ते सात महिन्यांचा कालावधी असल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तलावातील पाण्याचा अनावश्यक उपसा सुरू राहिल्यास भविष्यात नागरिकांसह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.

महावितरण कंपनीने मोटारींचा वीजपुरवठा बंद केला असला, तरी मोटारी तलावातच असल्याने सायफन पद्धतीने पाणी बाहेर काढले जात आहे का, याची प्रत्यक्ष पाहणी करून खातरजमा करणे गरजेचे आहे. सायफन पद्धतीने पाणी सुरू असल्याचे आढळल्यास ते तातडीने बंद करण्यासाठी संबंधित विभागाने कार्यवाही करावी. तसेच तलावातील मोटारी पाण्याबाहेर काढून घेण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

**पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी आताच खबरदारी आवश्यक\!**

येणाऱ्या सहा ते सात महिन्यांत पावसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याने सध्याचा पाणीसाठा जपून वापरणे ही काळाची गरज आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष घालून पाण्याचा अनावश्यक उपसा रोखला नाही, तर भविष्यात पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे जलसंधारण विभागाने तातडीने तलावाची पाहणी करून पाण्याचा अपव्यय रोखावा, मोटारी काढून घेण्याबाबत कार्यवाही करावी आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे, अशी अपेक्षा परिसरातून व्यक्त होत आहे.

Scroll to Top