सातारा (अजित जगताप ) : छत्रपतींची राजधानी असलेल्या साताऱ्यात आज रविवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी यवतेश्वर कास पठार ते पोलीस कवायत मैदान, सातारा शहर हाफ मॅरेथॉन स्पर्धा पहाटे आयोजित करण्यात आली होती. त्या वेळेला एक स्पर्धक श्री संजय कदम यांना हृदयविकाराने ग्रासले . स्पर्धे दरम्यान बोगदा परिसरात धावत असतानाच त्रास जाणवला. त्यांच्यावर प्लस हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत माहिती अशी की, साताऱ्यात गेली पंधरा वर्षापासून हाफ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये पहिला बळी स्पर्धकाचा गेला आहे. त्यामुळे या स्पर्धे दरम्यान शोककळा पसरली आहे. धावपटू श्री संजय कदम हे पुणे येथून स्पर्धेत सहभागी झाले होते. बोगदा परिसरात त्यांच्या पाठीमागून धावत येणारे मॅरेथॉन स्पर्धक डॉ . मुजावर व प्लस हॉस्पिटलचे डॉ. कौशिक पाटील, आणि मनीषा हॉस्पिटलचे डॉक्टर प्रतापराव गोळे यांनी तातडीने बोगदा परिसरातच धावपटू श्री संजय कदम यांची अवस्था पाहून जागेवरच प्राथमिक उपचार केले व तातडीने रुग्णवाहिका बोलवली.
रुग्णवाहिका येईपर्यंत (CPR – Cardiopulmonary Resuscitation) एकाद्या व्यक्तीचे हृदय धडधडणे थांबल्यास किंवा श्वास बंद झाल्यास प्राण वाचवणारी एक आपत्कालीन प्रक्रिया म्हणजे सी.पी.आर. उपचार सुरू केला. एकाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यावर हृदय रक्त पुरवणे बंद करते, तेव्हा मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी स्पर्धक संजय कदम यांच्या छातीवर दाब दिला . स्पर्धक संजय कदम यांना सपाट जमिनीवर झोपावून डॉक्टरांनी दोन्ही हात जोडून छातीच्या मधोमध एका मिनिटाला १०० ते १२० वेळा छातीवर वेगाने दाब दिला. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेले अनुभवी डॉक्टर मुजावर यांचे मिरज येथे दोनशे बेडचे हॉस्पिटल असल्यामुळे त्यांच्या अनुभवातून तातडीने स्पर्धक संजय कदम यांना रुग्णवाहिका आल्यानंतर रुग्णवाहिकेमध्येच तातडीने इंजेक्शन देण्यात आले.
त्यानंतर सातारा बस स्थानक पाठीमागील सुसज्ज प्लस हॉस्पिटलमध्ये दाखल करून अँजिओग्राफी करण्यात आली. त्यामध्ये अधिक तपासणी केली असता स्पर्धक संजय कदम यांची रक्तवाहिनी ब्लॉक झाल्यानंतर हृदयाला इजा पोचली होती, त्वरित नलिकेमध्ये स्प्रिंग टाकून एन्जोप्लास्टी करण्यात आली.
मॅरेथॉन धावपटू श्री कदम यांना थोडा आराम मिळाल्यानंतरच डॉ. प्रतापराव गोळे, डॉ .मुजावर, डॉ. कौशिक पाटील, डॉक्टर संग्राम देशमुख, डॉ ओमकार पाटील व हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी सहकारी केले होते. त्यानंतर हाफ मॅरेथॉन स्पर्धेतील संयोजक असलेले डॉक्टरांनी हॉस्पिटल मधून बाहेर पडून पोलीस कवायत मैदानावर सुरू असलेल्या मॅरेथॉन स्पर्धेकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. पुणे येथून आलेल्या श्री संजय कदम यांच्याकडे ज्यादा पैसे नसतानाही तातडीने उपचार झाल्यामुळे त्यांना काही काळासाठी जीवदान मिळाले. खऱ्या अर्थाने हाफ मॅरेथॉन स्पर्धा ही जीवनदायी ठरली असे वाटत असतानाच चार तासाने हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मानवली. या स्पर्धेमुळेच तातडीने उपचार मिळाला असला तरी त्यांच्या आयुष्याची दोरी टिकू शकली नाही. वैद्यकीय पथक वेळेत मिळाले होते. नामवंत डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नामुळे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा मानवता भावनेतून यशस्वी ठरली होती. त्याबद्दल अनेकांनी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे संयोजक व वैद्यकीय पथक यांचे मनापासून आभार मानले असतानाच धावपटू श्री संजय कदम यांच्या निधनाची वार्ता समजल्यामुळे संपूर्ण स्पर्धेमध्ये शोककळा पसरली होती. सदर श्री. संजय शामराव कदम यांचे मूळ गाव पाटण तालुक्यातील कडवे बुद्रुक हे आहे. ते पुण्यामध्ये स्थायिक झाले असून शास्त्रज्ञ होते. अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. ………………………………..
फोटो — साताऱ्यातील हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये स्पर्धकाचे जीव वाचवणारे त्रिमूर्ती डॉक्टरांनी प्रयत्न केले पण (छाया- अजित जगताप, सातारा)




