सातारा(अजित जगताप) : उंचावर बांधलेली दहीहंडी फोडण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे. साताऱ्यातील बऱ्याच नेत्यांची मुले दहीहंडी पासून लांब आणि कार्यकर्त्यांच्या मुलांचे थरावर थर पाहण्यास मिळत आहे. याची आता चर्चा होऊ लागलेली आहे. एकमेकांच्या मदतीने मानवी मनोरे उभे केले जातात. या नेत्र दीपक सोहळ्याला उदंड प्रतिसाद लाभत आहे. लाखाची बक्षिसे आणि संगीताचा दणदणाट व बिदागी बहादूरांना गुळांबा मिळत असल्याने दहीहंडीचे रूप बदलले आहे. यातून स्थानिक रहिवाशांचा सहभाग फार कमी होऊ लागलेला आहे. साताऱ्यात दरवर्षी चांगल्या पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने कार्यक्रम होतात. पारंपारिक पद्धतीने व हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अनेक ठिकाणी अत्यंत उत्साहात दहीहंडी साजरी होताना दिसत आहे. एक प्रमुख सांस्कृतिक उत्सव म्हणून अनेकांचा त्यामध्ये सहभाग असतो. धार्मिक व पौराणिक महत्त्व भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या खोडकर आणि खेळकर स्वभावाची आठवण यानिमित्त महानुभव मठ व श्रीकृष्ण मंदिरात पाहण्यास मिळत आहे. गोकुळात श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत उंच शिंक्यावर बांधलेले दही आणि लोणी चोरायचे, ज्याला ‘माखन चोर’ म्हटले जाते.हीच पौराणिक लीला प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. सामाजिक ऐक्य व संघटन दहीहंडीमध्ये विविध जाती-धर्मातील मंडळ व मित्रपरिवार सहभागी होतात. ज्यामुळे समाजात एकोपा वाढत असला तरी सध्या आता त्याचे चित्र बदलले आहे. वाढत्या बेरोजगारीने युवकांना भविष्याची चिंता लागलेली आहे. आयुष्याची दहीहंडी फोडण्यास अनेकांचे सहकार्य अपेक्षित आहे. पण दुर्दैवाने ते मिळत नसल्याने युवा पिढीला रोजंदारीसाठी पुण्या मुंबईला धाव घ्यावी लागते. राजकीय कुरघोड्या व मोठेपणा मिळवण्यासाठी दहीहंडी स्पर्धा सुरू झालेली आहे. हा सण आपल्याला संघभावना, जिद्द, आणि सामूहिक प्रयत्नांची प्रेरणा देतो. हे जरी खरे असले तरी काही नेत्यांची मुलं दहीहंडीमध्ये सहभागी होताना दिसत नाही. स्पर्धा परीक्षा व उद्योग व्यवसायातील अनेक हंडी फोडण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांना शुभेच्छा आहेत. सातारा शहरातील दहीहंडी उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत प्रसिद्ध आणि राजकीयदृष्ट्या तसेच सांस्कृतिकदृष्ट्या पूर्वी नावलौकिक प्राप्त करणारे होते. साताऱ्यात भाजपचे निर्विवाद सत्ता आहे. या उत्सवाला भाजपचे खासदार आमदार नव्हे तर विरोधी पक्षातील काहींनी सुद्धा दहीहंडीपासून स्वतःला अलिप्त ठेवले नाही. विधेयक दृष्टिकोन ऐवजी प्रसिद्धी व त्यासाठी लागणारे मनोरे उभे केले जातात. राजकीय पक्षाच्या समर्थकांकडून भव्य दहीहंड्यांचे आयोजन केले आहे. यामध्ये कोणत्याही गोविंदाचा अपघात होऊन त्यांना जखमी होण्याची वेळ येऊ नये. साठी सर्व जाती धर्मातील प्रार्थना स्थळांमध्ये प्रार्थना होत आहे. सांस्कृतिक व सणाचे पावित्र्य राखण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यालाच काळजी वाटते. सणाचे पवित्र राखावे. हे सुद्धा महत्त्वाचे आहे. वाई- कराड- फलटण आणि साताऱ्यातील काही भागांमध्ये अत्यंत शांततेने दहीहंडी उत्सव होत असल्याने शांतता प्रिय नागरिकांना त्याचा चांगलाच आस्वाद मिळत आहे. त्यांनी संयोजकांना धन्यवाद दिले आहे. तसेच या ठिकाणी काही कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या मुलाचा सहभाग हा खऱ्या अर्थाने सण साजरा केल्याचाच अनुभव सुद्धा येत आहे. ………………………… … फोटो– साताऱ्यातील प्रसिद्ध दहीहंडी (छाया- अजित जगताप, सातारा)




