ताज्या बातम्या

शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही; मात्र शिक्षण क्षेत्राची सेवा करण्याचे भाग्य लाभले : डॉ. गोरखनाथ पोळ

कामोठे, दि. ५ सप्टेंबर : शिक्षक होण्याची मनापासून इच्छा होती; मात्र प्रत्यक्ष शिक्षक म्हणून कार्य करण्याचे भाग्य लाभले नाही. तरीही परमेश्वराने शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची आणि जीवनदीप प्रकाशनाच्या माध्यमातून असंख्य शिक्षकांच्या संपर्कात राहून त्यांची सेवा करण्याची सुंदर संधी दिली, याबद्दल आपण स्वतःला भाग्यवान समजतो, असे प्रतिपादन डॉ. गोरखनाथ पोळ यांनी केले.
विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे, समाजाला योग्य दिशा देणारे आणि ज्ञानाचा दीप अखंड प्रज्वलित ठेवणारे शिक्षक हे खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते आहेत. शिक्षकांचे ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शन भावी पिढ्यांना सातत्याने प्रेरणा देत राहावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शिक्षक दिनानिमित्त आजणश मानसरोवर विद्यालय तसेच सेंट अग्रसेन हायस्कूल, कामोठे येथे आयोजित विशेष कार्यक्रमात शिक्षकांचा सॅनिटरी नॅपकिन, पुष्पगुच्छ व पेढे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
शिक्षकांच्या कार्याचा गौरव करताना डॉ. गोरखनाथ पोळ यांनी, “ज्ञानाचा दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रत्येक गुरुजनांना मनःपूर्वक व खूप खूप शुभेच्छा. त्यांचे ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शन भावी पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहो,” अशी सदिच्छा व्यक्त केली.

Scroll to Top