खडवली(एस. एल. गुडेकर ) : मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या जी.के.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खडवली यांच्या वतीने पावसाळी मॅरेथॉन स्पर्धा मोठया उत्साहात पार पडली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. सागर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेचे नियोजन व आयोजन महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. बाळाराम चौधरी यांनी केले.स्पर्धेचा शुभारंभ नडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.अरुणा चौधरी तसेच श्री. संतोष चौधरी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ.ए.जी.सागर यांनी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना मॅरेथॉन स्पर्धेचे महत्त्व तसेच नियमित व्यायाम व आरोग्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिनेश घरत यांनी केले.तसेच प्रा.प्रशांत तांदळे, प्रा. शफिक शेख आणि प्रा. रसिका लोकरे ,प्रा. प्राची गायकवाड यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
पावसाळी वातावरणातही विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडाभावना, शिस्त आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालय प्रशासनाने सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले.




