ताज्या बातम्या

कोपरखैरणेत ६ सप्टेंबरला भव्य श्री गुरुपौर्णिमा संगीत महोत्सव ; गुरुवर्य शाहीर रूपचंद चव्हाण यांचे विशेष गायन

नवी मुंबई (प्रतिनिधी) : कोपरखैरणे येथील स्वरवंदन संगीत अकॅडमीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही भव्य श्री गुरुपौर्णिमा संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी कोपरखैरणे गावातील तीन टाकी परिसरातील गणोबा गणेश मंदिरात सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हा संगीत सोहळा रंगणार आहे.
राष्ट्रभूषण शाहीर तसेच स्वामी गगनगिरी महाराजांचे परमभक्त गुरुवर्य शाहीर रूपचंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने या गुरुपौर्णिमा संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता गुरुपूजन सोहळ्याने होणार आहे. त्यानंतर स्वरवंदन संगीत अकॅडमीच्या विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारच्या गायनाची सुरेल मैफल सादर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या कार्यक्रमात संगीतप्रेमींना दर्जेदार गायनाचा आनंद घेता येणार आहे.
कार्यक्रमाच्या मध्यंतरात उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार असून, मान्यवरांचे मनोगतही होणार आहे. त्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांच्या गायनाने संगीताची मैफल रंगणार आहे.
या भव्य गुरुपौर्णिमा संगीत महोत्सवाची सांगता गुरुवर्य शाहीर रूपचंद चव्हाण सर यांच्या विशेष गायनाने होणार आहे. त्यामुळे संगीतप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल संगीत महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Scroll to Top