कराड (वार्ताहर) : कराड शहरात कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पोलिस यंत्रणेसोबत सार्वजनिक मंडळे आणि नागरिकांनी एकत्रित काम केल्यानंतरच कराड शहर अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुंदर होऊ शकेल. गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा वाढविणारा उत्सव असल्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी केवळ दिखाऊपणावर भर न देता समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, वाद टाळावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी मंगळवारी कराडला भेट दिली. यावेळी त्यांनी शहरातील काही सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे उपस्थित होते. यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
चौकट
आठही अजेंड्यांची प्रभावी अंमलबजावणी करणार…
कराड, मलकापूर, तसेच तालुक्यातील नागरिक सुज्ञ असून, प्रशासनाला त्यांचे नेहमीच सहकार्य मिळते. यापुढेही हे सहकार्य कायम राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पोलिस दल, नगरपालिका, सार्वजनिक गणेश मंडळे आणि नागरिक यांच्या समन्वयातून आठही अजेंड्यांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कराड शहर अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्याच्या प्रयत्नांना निश्चितच बळ मिळेल, असे पिंगळे यांनी सांगितले.




