मुंबई, दि. ३ सप्टेंबर : भारतीय पर्यटकांना इंडोनेशियातील समृद्ध वन्यजीव, निसर्गसौंदर्य आणि साहसी पर्यटनाचा अनुभव घेता यावा, यासाठी तमन सफारी इंडोनेशियाने विशेष सफारी पर्यटन उपक्रमाची घोषणा केली आहे. मुंबईतील प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत तमन सफारी इंडोनेशियाच्या प्रतिनिधींनी ही माहिती दिली.
इंडोनेशियात भारतीय पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत असून २०२३ मध्ये ६ लाख ६ हजार ४३९ असलेली भारतीय पर्यटकांची संख्या २०२४ मध्ये ७ लाख १० हजार २०७ आणि २०२५ मध्ये ७ लाख ३४ हजार ४९० वर पोहोचली. २०२६ मध्ये ७.५० ते ८.२० लाख भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्याचे इंडोनेशियाचे लक्ष्य आहे.
तमन सफारी इंडोनेशियाच्या सहा प्रमुख ठिकाणी ६७३ प्रजातींचे २२ हजारांहून अधिक प्राणी आहेत. बालीतील मरीन सफारीमध्ये समुद्री जीवसृष्टीचा अनुभव, तर तमन सफारी बालीमध्ये सफारी जर्नी, नाइट सफारी, सिंहांना खाद्य देण्याचा अनुभव आणि मारा रिव्हर सफारी लॉज अशा सुविधा उपलब्ध आहेत. बोगोरमधील ग्रेट तमन सफारीमध्ये ८,७०० हून अधिक प्राणी, तसेच जायंट पांडा आकर्षण आहे.
याशिवाय जकार्ता एक्वेरियम अँड सफारी, सोलो सफारी, ग्रँड तमन सफारी प्रिगेन आणि फंटॅस्टिक बीच सफारी बटांग ही आकर्षणेही पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत.
भारतीय पाहुण्यांसाठी शाकाहारी व भारतीय खाद्यपदार्थ, निवडक ठिकाणी भारतीय आचारी, खासगी वाहन, बहुभाषिक मार्गदर्शक तसेच कुटुंब आणि बहुपिढी प्रवास पॅकेज उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
तमन सफारी इंडोनेशियाचे मुख्य विपणन अधिकारी अलेक्झांडर झुलकर्नैन यांनी भारतीय पर्यटकांचे स्वागत करताना, इंडोनेशिया आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक व नैसर्गिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी पर्यटन महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले.




