मुंबई : धारावीतील सुप्रसिद्ध आर्यन गोविंदा पथकाने यंदाच्या दहीहंडी उत्सवात आपल्या धाडसी आणि कौशल्यपूर्ण कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तब्बल नऊ थरांची मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडण्याचा पराक्रम या पथकाकडून करण्यात येत असून, विश्वविक्रमाच्या दिशेने त्यांची दमदार वाटचाल सुरू आहे.
मुंबईतील गोविंदा पथकांमध्ये आर्यन गोविंदा पथकाने गेल्या काही वर्षांत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. धारावीपासून मुंबई आणि ठाणे परिसरापर्यंत विविध दहीहंडी उत्सवांमध्ये सहभाग घेत या पथकाने आपल्या थरांच्या विक्रमामुळे विशेष लोकप्रियता मिळवली आहे. यापूर्वी दादर परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहीहंडी उत्सवातही आर्यन गोविंदा पथकाने सहभाग घेत दहीहंडी फोडण्याचा पराक्रम केला होता.
नऊ थरांचा मनोरा उभारताना गोविंदांच्या सुरक्षिततेसोबतच शिस्त, समन्वय, सराव आणि धाडस यांना विशेष महत्त्व दिले जाते. या कामगिरीमागे आर्यन ग्रुपचे अध्यक्ष कल्पेश भितळे, समीर भोईटे,किरण जमखंडीकर यांची मेहनत, नियोजन आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरत आहे.
दहीहंडीच्या माध्यमातून पारंपरिक गोविंदा संस्कृती जपत आर्यन गोविंदा पथकाने मुंबईच्या क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी छाप निर्माण केली आहे.




