ताज्या बातम्या

मुंबईतील आमदारांच्या कामगिरीत घट; प्रश्नांची संख्या ७२ टक्क्यांनी कमी; पहिल्या तीन नंबर मध्ये काँग्रेस आमदारांनी मारली बाजी

मुंबई : प्रजा फाउंडेशनने ‘मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड २०२६’ हा अहवाल प्रसिद्ध केला असून, १५व्या विधानसभेतील मुंबईच्या आमदारांच्या कामगिरीबाबत चिंताजनक चित्र समोर आले आहे. हिवाळी अधिवेशन २०२४ ते पावसाळी अधिवेशन २०२५ या कालावधीत मुंबईतील आमदारांनी एकूण २,२१३ प्रश्न विचारले. १२व्या विधानसभेतील ७,९५५ प्रश्नांच्या तुलनेत ही संख्या तब्बल ७२ टक्क्यांनी कमी आहे.

रिपोर्ट कार्डमध्ये काँग्रेसचे आमदार अमिन पटेल ८२.८९ गुणांसह प्रथम, अस्लम शेख ८०.५८ गुणांसह द्वितीय, तर ज्योती गायकवाड ८०.३० गुणांसह तृतीय क्रमांकावर आहेत. ३३ आमदारांपैकी केवळ तीन आमदारांना ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.
आमदारांच्या सरासरी गुणांमध्येही घट झाली असून, १२व्या विधानसभेतील ६१ गुणांवरून ही सरासरी १५व्या विधानसभेत ५५ गुणांवर आली आहे. प्रश्नांच्या गुणवत्तेची सरासरीदेखील ५० टक्क्यांवरून ३३ टक्क्यांवर घसरली आहे.
१५व्या विधानसभेच्या पहिल्या वर्षात विधानसभेचे कामकाज केवळ ४० दिवस झाले. त्याआधी १२व्या आणि १३व्या विधानसभेत अनुक्रमे ४७ आणि ५० दिवस कामकाज झाले होते.
प्रजा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के आणि व्यवस्थापक असिफ खान यांनी नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे सभागृहात मांडणे, चर्चा घडवून आणणे आणि सरकारचे उत्तरदायित्व सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. अहवालातून लोकप्रतिनिधींच्या कामगिरीत अधिक सक्रियता आणि उत्तरदायित्वाची गरज अधोरेखित झाली आहे.

रिपोर्ट कार्डमधील आघाडीचे तीन आमदार

प्रथम क्रमांक — अमिन पटेल
काँग्रेस | गुण : ८२.८९
नागरिकांचे प्रश्न सभागृहात मांडणे, प्रश्न विचारणे, विधानसभेच्या कामकाजात सक्रिय सहभाग आणि उपस्थिती या विविध निकषांवर अमिन पटेल यांची कामगिरी सरस ठरली.

द्वितीय क्रमांक — अस्लम शेख
काँग्रेस | गुण : ८०.५८
नागरिकांच्या प्रश्नांना सभागृहात प्रभावीपणे मांडण्यासोबतच विधानसभेच्या कामकाजातील सहभाग आणि उपस्थितीच्या निकषांवर अस्लम शेख यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

तृतीय क्रमांक — ज्योती गायकवाड

काँग्रेस | गुण : ८०.३०
प्रश्नांची मांडणी, सभागृहातील सहभाग, उपस्थिती आणि लोकप्रतिनिधी म्हणून घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या निकषांवर ज्योती गायकवाड यांची कामगिरी चांगली राहिली.

Scroll to Top